Jalgaon Cotton Rate : 40 हजार क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांकडून खरेदी; अखेर शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री | Purchase of 40 thousand quintals of cotton from traders jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cotton

Jalgaon Cotton Rate : 40 हजार क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांकडून खरेदी; अखेर शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री

Jalgaon News : आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव नसल्याने जिल्ह्यातील कापसाला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मागणी नाही. परिणामी, शेतकऱ्यांना हवा असलेला दहा ते तेरा हजारांचा दर मिळत नाही. (Purchase of 40 thousand quintals of cotton from traders jalgaon news)

आता नवीन खरीप हंगाम पुढे असताना, मागील हंगामाचाच कापूस घरात शिल्लक आहे. मे महिना सुरू झाल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी अखेर कंटाळून कापूस विक्रीस काढला आहे. बुधवारी (ता. १७) जिल्ह्यात ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली असल्याची माहिती जिनिंग चालकांनी दिली.

यंदा कापसाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला नाही. मागील वर्षी कापूस कमी होता आणि मागणी अधिक असल्याने कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही तोच दर मिळेल, या आशेने २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी ११० टक्के कापसाची लागवड केली.

मात्र, कापसाची आवक सुरू झाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी झाले. परिणामी, जिल्ह्यात कापसाला आठ ते नऊ हजारांदरम्यान दर दिवाळीपर्यंत मिळाला. नंतर मात्र कापसाला साडेसात ते आठ हजारापर्यंत दर मिळाला. तो आणखी कमी होत गेला. आता तर सात ते साडेसात हजार रुपये दर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल, अशी वाट आतापर्यंत पाहिली. यामुळे ७० ते ८० टक्के कापूस घरातच आहे. आता मात्र २०२३ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे आता बियाणे, खते, मजुरीसाठी पैसे लागतील. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील धरणगाव, बोदवडसह अनेक ठिकाणी जिनिंग चालक कापूस विकत घेत आहेत. शेतकरी अडचणीत असला, तरी जादा भाव देणे व्यापाऱ्यांनाही परवडणारे नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कापसाला मागणी नाही.

कापसाच्या खंडीचे दर आंतराष्ट्रीय स्तरावर ६२ हजारावरून ५८ हजारांपर्यंत खाली आले आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावरच दर कमी असेल, तर आम्हालाही कमी दरानेच कापूस घ्यावा लागेल, अशी माहिती जिनिंग चालकांनी दिली.

"शेतकरी कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र, कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर मिळत नाही. तिकडे आपल्या कापसाला मागणीच नाही. यामुळे यंदाचा जिनिंग प्रेसिंगचा हंगाम जोरात गेला नाही. आता कापसाला सात ते साडेसात हजारांपर्यंत दर आहेत." -प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन

टॅग्स :JalgaonFarmercotton