
Rajya Kabaddi Spardha : महिलांचा पुणे, पुरुषांच्या मुंबईचे यंदा तिसरे जेतेपद; शिवाजी महाराज चषकावर नाव
जळगाव : महिला गटात पुण्याने, तर मुंबई शहरने पुरुषांच्या गटातील अंतिम सामने जिंकत २१ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
दोन्ही संघांनी या वर्षातील जेतेपदाची ‘हॅट्रिक’ साजरी केली. (rajya kabaddi spardha Women Pune Men Mumbai team won third time this year jalgaon news)
अहमदनगर येथे झालेली ७० वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, बारामती-पुणे येथे झालेली मिनी ऑलम्पिक आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चषक हे तिसरे जेतेपद.
जळगाव येथील सागर पार्क मैदानातील मॅटवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार ३७-२८ असा मोडून काढत रोख १ लाख ५० हजार रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व १ लाखाचे बक्षीस मिळाले.
पुरुषांमध्ये मुंबई
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान २८-२५ असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख १ लाख ५० हजार रुपये आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख एक लाखाचे उपविजेतेपदाचे बक्षीस मिळाले. मुंबईने नाणेफेक जिंकत मैदानाची निवड केली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
अहमदनगरने आक्रमक सुरवात करीत पहिल्या काही मिनिटांत आघाडी घेतली, पण त्याने विचलित न होता मुंबईने पहिल्या सत्रातच २ लोण नोंदवित २१-०८ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र सावध खेळ करण्याच्या नादात बेसावध राहणाऱ्या मुंबईवर नगरने एक लोण देत आपली आघाडी कमी केली.
पुन्हा काही गुण घेत आघाडी एका गुणापर्यंत खाली आणली. नंतर मात्र अतिशय संयमाने खेळ करीत ३ गुणांनी मुंबईने विजेतेपदाचा चषक उंचावला. प्रणय राणे, अक्षय सोनी, सुशांत साईल यांच्या चतुरस्त्र चढाया, तर संकेत सावंत, हर्ष लाड यांच्या भक्कम पकडीमुळे मुंबईने विजय साकारला. शिवम पठारे, तुळशीदास वायकर यांनी अहमदनगरकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली, पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.