Police Recruitment : तीन आठवड्यांत नियुक्तिपत्र देऊन सुधारित यादी जाहीर करण्याचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Constable

Police Recruitment : तीन आठवड्यांत नियुक्तिपत्र देऊन सुधारित यादी जाहीर करण्याचे निर्देश

जळगाव : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (मुंबई) यांनी पोलिस शिपाई चालक पदासाठी राबविलेल्या भरती प्रक्रियेत सुधारणेचे निर्देश देत, ज्या उमेदवारांनी फक्त एकाच जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,

त्यांना तीन आठवड्यांत नियुक्तीपत्र देऊन सुधारित यादी जाहीर करावी, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर व औरंगाबादच्या खंडपीठाने दिला. (Recruitment for post of Police Constable Driver Directed to announce revised list by issuing appointment letter within 3 weeks jalgaon news)

तीन खंडपीठाने एखाद्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात दिलेला हा बहुधा पहिलाच निकाल असावा. या संदर्भात जळगाव येथील व सध्या मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड दर्शना आर. नवाल आणि ॲड. प्रणव आव्हाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी ः अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी ३० नोव्हेंबर २०१९ च्या जाहिरातीद्वारे पोलिस शिपाई (ड्रायव्हर) पदाच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया स्वतंत्र युनिट्स/जिल्ह्यांसाठी आयोजित केली होती.

सुमारे नऊ हजार ८२७ उमेदवारांनी (अर्जदारांचा पहिला संच) जाहिरातीतील अटी व शर्तीचे उल्लंघन करीत एकापेक्षा जास्त युनिट/जिल्ह्यांसाठी फॉर्म भरले आणि परीक्षाही दिल्या. अशा उमेदवारांची नावे जरी गुणवत्ता यादीत समाविष्ट केली गेली, तरी एकापेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले म्हणून भरती प्रक्रियेच्या अटी, शर्तींचे उल्लंघन केले म्हणून सुधारित गुणवत्ता यादीतून ते हटविण्यात आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

गुणवत्ता यादीतून वगळण्यात आलेल्या उमेदवारांनी (अर्जदारांच्या पहिल्या संचाने) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल करून सुधारित गुणवत्ता यादीला आव्हान दिले. न्यायाधिकरणाने पुढील प्रक्रियेत उमेदवारी विचारात घेऊन त्यांच्या अर्जांना परवानगी दिली.

११ एप्रिल २०२२ च्या या आदेशाच्या अंमलबजाणीमुळे ज्या उमेदवारांनी एकच फॉर्म (उमेदवारांचा दुसरा संच) भरले होते, त्यांनी या आदेशावर आक्षेप घेत अर्ज दाखल केला. त्यामुळे हे प्रकरण मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीन खंडपीठात सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी या तीन खंडपीठासमोर झाली.

या खंडपीठाने १७ मार्च २०२३ ला निकाल दिला आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरले होते. अर्थात, अर्जदारांच्या पहिला संचच्या बाजूने जारी केलेल्या नियुक्त्या बाजूला ठेवत पोलिस आयुक्तांना निकालाच्या तारखेपासून तीन आठवड्यांच्या आत सुधारित निवड यादी तयार करण्याचे आदेश दिले. खटल्यात उमेदवारांच्या दुसऱ्या संचाची बाजू ॲड. प्रणव आव्हाड आणि ॲड. दर्शना नवाल यांनी खंडपीठात मांडली.