
Jalgaon Crime News : समतानगरात कापला रिक्षाचालकाचा कान; जातीय तेढसाठी टवाळखोरांचा उपद्रव!
Jalgaon News : शहरातील समतानगर येथे प्रवासी घेऊन आलेल्या रिक्षाचालकाच्या डोक्यावर टोपी व दाढी असल्याने काही टवाळखोरांनी रिक्षा अडवून त्याला मारहाण केली, तर शाहूनगरात मोबाईल चोरीच्या संशयातून तरुणाला मारहाण करत त्याची धिंड काढण्यात आली. (Rickshaw driver ear cut off in Samata Nagar jalgaon crime news)
तांबापुरा येथील शेख सलीम शेख गुलाब (वय ४८) रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे रविवारी (ता. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास तांबापुरा ते समतानगर असे प्रवासी भाडे घेऊन ते समतानगरात पोचले. तेथे अंबिका किराणा स्टोअरजवळ पावणेअकराच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्याचे वाहन आडवून आरडाओरड करत शिवीगाळ केली.
प्रवाशांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोडून परत जात असताना, त्याच तरुणांनी जोरजोरात घोषणा देत पुन्हा रिक्षा अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करताना एकाने लोखंडी रॉड मारून बोट फ्रॅक्चर केले, तर दुसऱ्याने धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने उजव्या कान कापला गेला.
जीव वाचविण्यासाठी रिक्षा सोडून पळत असताना, नागेश्वर कॉलनीत बेशुद्ध झाले. जखमी सलीम शेख याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न
जळगाव शहरातील समतानगर आणि शाहूनगरमध्ये रविवारी घडलेल्या घटना भिन्नधर्मीय व्यक्तीला मारहाणीच्या असून, अशाच घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होऊन मोठी दंगल उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोबाईल चोरीच्या संशयातून शाहूनगरात तरुणाची धिंड
शाहूनगरातील प्रस्तावित जिल्हा न्यायालयाच्या जागेवर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अंडा लॉरीसमोरच दारूचा गुत्ता असून, तेथे दारू पिऊन दारूडे रात्रभर धिंगाणा घालतात. असाच काहीसा प्रकार रविवारी (ता. २८) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडला.
दारूच्या नशेत तर्रर्र झाल्यावर एका तरुणाने मोबाईल चोरल्याच्या संशयातून शाहूनगरातील काही तरुणांनी एकाला धरले. त्याची थर्ड-डीग्री चौकशी सुरू करूनही तो कबुली देत नाही, म्हणून थेट गचांडी पकडूनच या तरुणाला बेदम मारहाण करत शाहूनगरापर्यंत त्याची धिंड काढली. काही ज्येष्ठ नागरिकांनी या तरुणाची सोडवणूक केली.
साहेबांच्या ‘बिदागीत’ पोलिस ठाणे व्यस्त
शाहूनगरात एका तरुणाला मारहाण करून धिंड काढली जात असताना, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निरोप समारंभात पोलिस ठाणे व्यस्त होते. एक सामाजिक कार्यकर्ता व पोलिसांच्या खबरीनेही फोन लावून बघितला. मात्र, पोलिस गाडी पाठवतो, असे सांगून फोन ठेवून देण्यात आला.
पत्री मशिदीचा परिसर आणि समोर ट्रॅफिक गार्डनच्या मोकळ्या जागेत वेगवेळ्या परिसरातील गुंड-गुन्हेगारांचा वावर वाढला असून, जिल्हापेठ-शहर पोलिस ठाण्याची सामाईक हद्द असल्याने दोन्ही पोलिस ठाण्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे.