
SAKAL Impact : अजिंठा चौफुली चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल; पती-पत्नीला ओळख पटवून घेतले पोलिसांनी ताब्यात
SAKAL Impact : शहरातील अजिंठा चौकात दिवसा महिला तरुणावर चाकूने वार करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी दोन दिवस पोलिसांनी कुठलही नोंद न करण्याची तसदी घेतली नाही.
अखेर ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर चाकू हल्ला करणारी महिला व पुरुषाची ओळख पटली असून, माधुरी व सागर राजगिरे, अशी त्यांची नावे असून, महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (SAKAL Impact case filed in case of Ajantha Chauphuli knife attack police identified husband and wife in custody jalgaon crime news)
अजिंठा चौकात दिवसा महिला पुरुषावर चाकूने हल्ला करून रक्तबंबाळ करते. शिवीगाळसह जवळपास पाऊण तास हा धिंगाणा सुरू होता. रविवारी (ता. ७) दुपारी तीनला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन अनेकांनी जळगावचाच व्हिडिओ असल्याबाबत खात्री केली.
ही घटना शनिवार (ता. ६) ची असून, जखमी तक्रार देण्यास न आल्याने नोंद होऊ शकली नाही, असे एमआयडीसी पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ‘सकाळ’ने याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चाकू चालवणारी महिला कोण? याबाबत दिवसभर चर्चा होती.
एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ व्हायरल व्हिडिओतील महिलेचा शोध सुरू केला. व्हायरल व्हिडिओत पुरुषावर चाकूने वार करणारी महिला माधुरी सागर राजगिरे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) असून, चाकूने हल्ला झालेल्याचे नाव संदीप भिकन राजगिरे आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ते दोघे पती-पत्नी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, योगेश बारी, छगन तारूडे, किरण पाटील, मीनाक्षी घेटे यांनी माधुरी राजगिरे हिला सोमवारी (ता. ८) ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, माधुरी आणि सागर यांनी प्रेमविवाह केला आहे. व्हायरल व्हिडिओतील संवादावरून सागर याचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा संशयातून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन पत्नीने हातात चाकू घेतल्याचे सांगण्यात आले.