Jalgaon News: ‘सीट बेल्ट अलार्म स्टॉपर’ने चालकाच्या जिवाला धोका! निर्बंध असताना सर्रास ऑनलाइन विक्री | Seat belt alarm stopper endangers drivers life Widespread online sales while restricted Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seatbelt

Jalgaon News: ‘सीट बेल्ट अलार्म स्टॉपर’ने चालकाच्या जिवाला धोका! निर्बंध असताना सर्रास ऑनलाइन विक्री

Jalgaon News : कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून ‘सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप’ विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत ग्राहक पंचायत सतर्क झाली असून, त्यांनी कारचालकांना आवाहन केले आहे. (Seat belt alarm stopper endangers drivers life Widespread online sales while restricted Jalgaon News)

कारमधून प्रवास करताना सुरक्षेसाठी गाडीतील सर्वांनी सीट बेल्ट लावणे आवश्‍यक व कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे. काही वर्षांपासून उत्पादकांनी कार उत्पादन करताना सीट बेल्ट लावला नाही, तर सूचना करणाऱ्या अलार्मची सुविधा प्रत्येक कारमध्ये देण्यात आली आहे. चालक बेल्ट लावत नाही, तोपर्यंत हा ‘बीप बीप’ अलार्म वाजतच राहतो.

‘अलार्म स्टॉपर’ची विक्री

सीट बेल्ट आवश्‍यक असताना, काहींना तो लावायचा नसतो. बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजत राहतो. तो वाजू नये, म्हणून ‘अलार्म स्टॉपर’ बाजारात आले आहेत. त्याची अनधिकृत विक्री सर्रास सुरू आहे. किरकोळ बाजारात व ऑनलाइन साइटवरही हे अलार्म स्टॉपर उपलब्ध असते.

त्यावर विविध प्रकारच्या सवलतीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याद्वारे कारचालकासह प्रवाशांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे. ग्राहक पंचायतीकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासंबंधी पंचायतही सतर्क झाली असून, अशा प्रकारच्या उत्पादनांवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ग्राहक पंचायतीचे आवाहन

अशा प्रकारचे उत्पादन करणारी कंपनी, विक्रेता, ई-कॉमर्स संस्था सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप विक्री करीत असेल, तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. ग्राहकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार असेल, तर ग्राहक पंचायत त्याविरोधात तीव्र कारवाई करेल.

याबाबत नागरिक ग्राहक पंचायतीकडे लेखी तक्रार करू शकता किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन, तसेच १९१५ वर कॉल करून तक्रार करू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :accident