
Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील जवानाला वीर मरण
Jalgaon News : बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या आर्मीच्या वाहनाचे मागील फाटक मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक तुटले. या अपघातात लोण (ता. अमळनेर) येथील सैनिकाला वीर मरण आले. (soldier died in accident in Amalner jalgaon news)
लोण येथील लिलाधर नाना पाटील (वय ४२) हे आसाममधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. आसामहून ४०० किलोमीटरवर असलेल्या अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाली होती.
आर्मीच्या ट्रकमध्ये २० जणांची तुकडी नेली जात होती. लिलाधर हे मागे बसले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचे मागील फाटक तुटल्याने लिलाधर खाली पडले. दगडाचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
त्यांचे शव गुरुवारी (ता. १८) सकाळी लोण येथे आणण्यात येणार असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडिल, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते वायरमन प्रवीण पाटील यांचे मेव्हणे होत.