अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्‍न सोडवा; रावसाहेब दानवेंना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb danve

अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्‍न सोडवा; रावसाहेब दानवेंना साकडे

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातून जळगावला नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सद्यःस्थितीत सकाळी सहाच्या महाराष्ट्र एक्स्प्रेसनंतर दुपारी बारालाच गाडी आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत असल्याने पूर्वीसारखी देवळाली-भुसावळ पॅसेंजर तातडीने सुरू करावी, असे साकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) पाटील यांना घातले. त्यावर मंत्री दानवे यांनी प्राधान्याने दखल घेण्याचे आश्‍वासन दिल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

एका कार्यक्रमानिमित्त आमदार मंगेश चव्हाण जालना येथे गेले होते. त्या वेळी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आवर्जून भेट घेतली. आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावरून नियमित अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात सविस्तर चर्चा करून रेल्वेसंदर्भातील काही मागण्यांचे निवेदनही श्री. दानवे यांना दिले. चाळीसगाव जिल्ह्यातील सर्वांत मोठे नाशिक, धुळे, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील शहर आहे. येथून जळगावला सर्वसामान्य नागरिकांसह नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचा प्रवास अतिशय सोयीचा आहे. येथील प्रवाशांना सर्वार्थाने सोयीची असलेली नाशिक-भुसावळ शटल बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. या संदर्भात दोन्ही खासदारांकडून भ्रमनिरास झाल्याने अप-डाउन करणाऱ्यांसह रेल्वे प्रवासी संघटनेने आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्याची गांभीर्याने दखल घेत आमदार चव्हाण यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवेंना निवेदन देऊन वस्तुस्थिती कथन केली.

हेही वाचा: मुलगी बघायला आले अन्‌ सरबताच्या ग्लासवर उरकले लग्न

अशा केल्या मागण्या

येथील स्थानकावरून महानगरी, महाराष्ट्र व कुशीनगर या तिन्ही रेल्वेगाड्या सकाळी सहाच्या अगोदर आहेत. त्यामुळे अप-डाउन करणाऱ्यांना पहाटे चारला उठून धावपळ करत रेल्वेगाडी पकडावी लागते. चाळीसगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेसची पूर्वीची वेळ सकाळी सातला होती. त्यामुळे ती पूर्ववत वेळेत करावी. देवळाली-भुसावळ पॅसेंजर त्याच वेळेला सुरू करावी, मासिक पासची सुविधा अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ उपलब्ध करून द्यावी, सध्या इगतपुरी ते भुसावळदरम्यान सुरू झालेली मेमू गाडी मुंबईपर्यंत शक्य नसल्यास किमान कल्याणपर्यंत न्यावी. रोहिणी रेल्वेस्थानक भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, जवळच्या १० ते १२ गावांना जोडले आहे. या स्थानकावर दोन्ही पॅसेंजरचा थांबा पूर्ववत करावा आदी मागण्यांचे निवेदन आमदार चव्हाणांनी दानवे यांना दिल्यानंतर त्यावर त्यांनी दखल घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना देवळाली-भुसावळ शटल केव्हा सुरू होते, याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: ''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम

Web Title: Solve The Problem Of Railway Passengers Request To Raosaheb Danve Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top