Jalgaon News : रस्त्यावरील गतिरोधकांमुळे अपघातांचा धोका; महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्ष | Speed ​​breakers erected on roads are not painted with white stripes to make them easily visible jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News : रस्त्यावरील गतिरोधकांमुळे अपघातांचा धोका; महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्ष

Jalgaon News : रस्त्यावरील गतिरोधकांमुळे अपघातांचा धोका; महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्ष

Jalgaon News : शहराच्या अंतर्गत भागातून गेलेल्या जुन्या महामार्गाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले. महामार्ग प्राधिकरण विभागाने वरणगाव क्षेत्रातील महामार्गावर गतिरोधकांना उंचीचे प्रमाण ठरवून दिलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करुन नियमांना हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. (Speed ​​breakers erected on roads are not painted with white stripes to make them easily visible jalgaon news)

रस्त्यावर उभारलेले गतीरोधक वाहनचालकांच्या सहज लक्षात यावे, यासाठी ‘झेब्रा क्रॉसिंग’प्रमाणे पांढऱ्या रंगाचे पट्टे आखणे आवश्‍यक असताना ते रंगवलेले नाहीत. काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

त्यामुळे महामार्ग विभागाने किमान आवश्‍यक त्या ठिकाणी ‘झेब्रा क्रॉसिंग’प्रमाणे पांढऱ्या रंगाचे पट्टे आखावेत तसेच रात्रीच्या सुमारास गतीरोधक दिसण्यासाठी ‘रिफ्लेक्टर’ तरी बसावावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी ठराविक अंतरावर तसेच शाळा, दवाखाने आदींजवळ गतिरोधक बसवले जातात. मात्र, कोणत्या रस्त्यावर व कोणत्या ठिकाणी गतिरोधक असावेत, याची नियमावली आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीशिवाय व महामार्ग अभियंत्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमानुसार गतिरोधक बसवणे आवश्‍यक आहे.

शहरात मात्र, या सर्व नियमांना फाटा देऊन स्थानिक काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली महामार्ग प्राधिकरण विभागाने जुन्या महामार्गाचे नुतनीकरण करतेवेळी नियमबाह्य पद्धतीने गतिरोधक बसवले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या गतिरोधकांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले पांढऱ्या रंगाचे पट्टे देखील मारलेले नाहीत. रात्रीच्या वेळी अपघात टाळला जावा यासाठी गतिरोधकांवर लाइटांप्रमाणे चमकणारे ‘रिफ्लेक्टर’ देखील बसवणे अपेक्षित असताना ते देखील बसवलेले नाहीत.

नियम काय सांगतो

नियमानुसार ज्या ठिकाणी गतिरोधक आहे, त्या ठिकाणी उजव्या व डाव्या बाजूला गतिरोधक असल्याचा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याचे समजावे, यासाठी ‘झेब्रा क्रॉसिंग’प्रमाणे पट्टेरी रंग देणेही बंधनकारक आहे. शहरात जाणारा किंवा शहरातून जाणारा कोणताही मार्ग अथवा महामार्गावर गतीरोधक करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेची परवानगी घेणे बंधनकारक असते.

या गतिरोधकांसाठी वाहतूक शाखेची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने अधिक उंचीचे गतीरोधक उभारले आहेत. ज्यामुळे अनेक वाहनांचे लहानमोठे अपघात झाले आहेत. काही वाहनचालकांना तर मणक्याला गंभीर दुखापती होत आहेत.

महामार्गाच्या विकासाकरीता पाठपुरावा करणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाला नियमबाह्य पद्धतीने केलेल्या गतिरोधकांसंदर्भात जाणीव करुन द्यावी, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

गतिरोधक नव्हे, वाहन पाडण्याचे ठिकाण

येथील गतिरोधक हे वाहनाची गती रोखण्याचे काम करण्याऐवजी वाहन पाडण्याचे काम करीत आहेत. चुकीच्या पद्धतीने जास्त उंचीच्या बनवलेल्या गतिरोधकांमुळे दररोज एक- दोन दुचाकीस्वार पडतच असतात.

उंच गतिरोधकांमुळे वाहने घसरुन वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून होत असल्याचे दिसत असूनही ही समस्या दूर करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, अशा स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात लवकरच राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करु, असा इशाराच शहरातील सूज्ञ नागरिकांनी दिला आहे.

"रस्ता व वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील महामार्गावर ठिकठिकाणी गतीरोधक उभारले असले तरी ते नियमबाह्य आहेत. वाहनचालकांना अधिसूचना म्हणून सुचना फलक लावणे किंवा रस्त्यावर पांढरेपट्टे लावणे आदींसंदर्भात पोलिस ठाण्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला यापूर्वीच पत्र दिले आहे."-आशिषकुमार आडसुळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक वरणगाव