
वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर दगडफेक
अमळनेर (जि. जळगाव) : गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या वीज चोरीवर नियंत्रणासाठी दोन दिवसांत वीज मंडळ अधिकाऱ्यांनी शहरात ३०२ ठिकाणी छापे टाकून वीज जोडणी कापून मीटर जप्त केले आहेत. दरम्यान, सानेनगर भागात वीज कर्मचारी पथक कारवाई करायला गेले असता काहींनी गोंधळ घालून कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. तर एकाने वीट फेकून मारली. इस्लामपुऱ्यात देखील नागरिकांनी गोंधळ घालून वीज मंडळावर मोर्चा काढला. अखेर दोन्ही ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे जमाव शांत झाला. (Latest Marathi News)
हेही वाचा: पीक पाहणीसाठी नवीन ‘ई पीक ॲप’ : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
एप्रिल महिन्यात भारनियमन होऊ लागल्याने सानेनगर भागातील नागरिकांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी त्या भागात ६० टक्के तोटा होत असून, विजेची हानी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. वीज चोरणाऱ्या आणि मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मात्र नियमित बिल भरणाऱ्यांना त्रास का देता? असा पवित्रा नागरिकांनी घेतल्यानंतर वीज मंडळ अधिकाऱ्यांनी १ ऑगस्टपासून ४० जणांचे पथक तयार करून ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे, अशा सानेनगर, तांबेपुरा, अमळेश्वरनगर, शाह आलमनगर, बंगाली फाईल, माळीवाडा, कुंभारवाडा, प्रसादनगर, समर्थनगर, इस्लामपुरा आदी ठिकाणी छापे टाकले.
कार्यकारी अभियंता रमेश पवार, प्रशांत ठाकरे, शहर अभियंता वैभव देशमुख, शहर अभियंता नीलेश कुरसुंगे यांच्यासह चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील अभियंते व कर्मचारी असा एकूण ४० जणांचा पथकात समावेश होता. वीज चोरी करणाऱ्यांमध्ये दोन पोलिस, शिक्षक, सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब, एक माजी नगरसेवक आदींचा समावेश आढळून आला. सरासरी ३० हजार रुपये दंडाप्रमाणे ३०२ ग्राहकांकडून ९० लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
हेही वाचा: रिकम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे फायदे, पाहा कोणते...
''काही ग्राहक मीटरच्या मागे एक बारीक छिद्र पाडून आतील वायर कट करतात व नंतर ‘फेव्हीक्विक’ने ते छिद्र बुजवून त्यावर पॉलिश करून गुळगुळीत केले जाते. मात्र आरडीएफ यंत्रणा असल्याने कुठे छेडछाड केली याची माहिती मिळून जाते, गैरप्रकार करणाऱ्या ग्राहकांवर कठोर व दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे.'' - प्रशांत ठाकरे, उपकार्यकारी अभियंता, अमळनेर
Web Title: Stones Pelted On The Team Of Mahavitaran Who Went To Catch Electricity Theft
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..