Board Exam : ‘झुमकावाल्या पोरी’चा परीक्षार्थींना ताप; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students have to suffer due to loud sound of Dolby and band while 10th and 12th exams are underway jalgaon news

Board Exam : ‘झुमकावाल्या पोरी’चा परीक्षार्थींना ताप; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

अमळनेर (जि. जळगाव) : दहावी-बारावीच्या परीक्षा (Board Exam) सुरू असतानाच डॉल्बी व बॅण्डच्या कर्कश आवाजामुळे मात्र विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. (students have to suffer due to loud sound of Dolby and band while 10th and 12th exams are underway jalgaon news)

पोलिस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी माध्यमिक पतपेढी संचालक तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, टी. डी. एफ. तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, सचिव राहुल बहिरम यांनी केली आहे.

सध्या ग्रामीण व शहरी भागात लग्नसराई जोरात सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला दहावी व बारावीच्या परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत. मात्र ऐन या परीक्षांच्या अभ्यासावेळी कॉलनी तसेच ग्रामीण भागात हळद, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वाजणाऱ्या डॉल्बी, बॅण्ड तसेच लाऊडस्पीकरमुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.

काही ठिकाणी लग्न दहा दिवसांवर असले तरी रोज रात्री स्पीकर लावून गाणे वाजवले जात आहे. अनेक भागात मध्यरात्रीपर्यंत हा धुमधडाका सुरूच असतो. यामुळे मात्र विद्यार्थ्यांसोबतच सामान्य नागरिकांना त्रास होतोय. याचा बंदोबस्त व्हावा, ही मागणी सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

"कर्कश आवाज तसेच गोंधळामुळे अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी खूप चिडचिड होते." - विशाल पाटील दहावी विद्यार्थी, जी. एस. हायस्कूल

"रोजच आजूबाजूच्या कॉलनी भागात कुठे ना कुठे लग्नसमारंभ असल्याने रात्री अकरा, बारापर्यंत तो आवाज सुरूच असतो. यामुळे मात्र ऐन परीक्षेत मुलांच्या अभ्यासावर ताण पडत आहे." - रोशनी पाटील, गृहिणी, अमळनेर

"आधीच कोविडमुळे दोन वर्षे शिक्षणाची बुडाली आहेत. मात्र डीजे, बॅण्ड, लाऊडस्पीकरच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्या गुणांवर तसेच शाळांच्या गुणवत्तेवर याचा हमखास परिणाम होईल." - संजय पाटील, तालुकाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ

"नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाण ठेवून दहाच्या आत सर्व वाद्य आणि स्पीकर बंद करावीत. पोलिसांनी देखील दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी." - जयवंतराव पाटील, जिल्हाध्यक्ष, संस्थाचालक संघटना, जळगाव

"आम्ही सर्व नियम पाळतो, कायद्याची अंमलबजावणी करतो. मात्र नागरिकच आम्हाला सांगतात की वाजवा आम्ही पाहून घेऊ. त्यामुळे इतरांनाही त्रास होतो." - गणेश गुरव, डीजे चालक, अमळनेर