सासरवासाला अखेर कंटाळली, दोन मुलासंह आईने विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवली 

सासरवासाला अखेर कंटाळली, दोन मुलासंह आईने विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवली 

भडगाव : कनाशी (ता. भडगाव) येथे आई व दोन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. सासरच्या मंडळींनी थ्रेशर मशिन विकत घेण्यासाठी विवाहितेवर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव आणला म्हणून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळीने केला आहे. त्यामुळे पतीसह सासू-सासरे, जेठ आदींवर भडगाव पोलिस ठाण्याला गुन्हा करण्यात आला. 

कनाशी येथे राहत असलेल्या गायत्री पाटील (वय ४३), मुलगा खुशवंत पाटील (१०), मुलगी भैरवी पाटील (८) या तिघांचा मृतदेह बुधवारी (ता. २४) विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात होती. मात्र, गुरुवारी (ता. २५) विवाहितेचे वडील दिलीप पाटील (वय ६३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे व जेठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मुलगी गायत्री हिला पती दिनेश पाटील, सासू पमा पाटील, सासरे निंबा पाटील, जेठ बबन पाटील, जेठाणी सोनी पाटील यांनी थ्रेशर मशिन घेण्यासाठी ५० हजार रुपये, तर कनाशी येथे प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपयांची वेळोवेळी मागणी केली होती. तिला प्रसंगी मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रास असह्य झाल्याने मुलगी गायत्रीने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास शेतातील विहिरीत दोन मुलांसह आत्महत्या केली. संशयित आरोपींविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पती, सासरे व जेठाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विवाहितेवर खुनाचा गुन्हा दाखल 
दरम्यान, बुधवारी तिघांच्या मृत्यूनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र विवाहिता मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली म्हणून सहाय्यक फौजदार छबीलाल नागरे यांच्या तक्रारीवरून मृत गायत्री पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com