साखर हंगाम मध्यावर; राज्यात ४०५ लाख टन गाळप
राज्यातील आठही विभागांचा विचार करता रोज सुमारे पावणेसात लाख टन उसाचे गाळप होत असून, धुराळ्यांनी वेग धरला आहे.
गणपूर (ता. चोपडा) : राज्यभरात साखर हंगाम मध्यावर येत असून, २९ डिसेंबरअखेर ४०५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ३८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. डिसेंबरअखेरचा हंगाम पाहता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४५ इतका राहिला आहे.
आवश्य वाचा- भूकंपाचा झटका आणि ग्रामस्थांची एकच धावपळ; किल्लारी घटनेची झाली आठवण
राज्यभरात या वर्षी ९० सहकारी व ७८ खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळप हंगाम सुरू केला असून, बऱ्याच भागात ऊसतोडणी हंगाम मध्यावर आला आहे. राज्यातील आठही विभागांचा विचार करता रोज सुमारे पावणेसात लाख टन उसाचे गाळप होत असून, धुराळ्यांनी वेग धरला आहे. राज्यभरात ऊसतोडणी मजूर व हार्वेस्टिंग मशिनच्या सहाय्याने ऊसतोडणी सुरू आहे.
सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात असून, तो ११ आहे, तर सर्वाधिक कमी साखर उतारा नागपूर विभागाचा असून, तो ७.७९ इतका आहे, तर राज्यात आतापर्यंत ९.४५ साखर उतारा राहिला आहे.
खानदेशातील स्थिती
खानदेशात शहादा येथील तापी सातपुडा सहकारी कारखान्याने एक लाख ८५ हजार ५६० टन उसाचे गाळप केले असून, एक लाख ४९ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ८.६ इतका आहे. डोकारे येथील आदिवासी साखर कारखान्यात ४८ हजार ८२१ टन गाळप झाले असून, ३७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन केले असून, उतारा ७.६२ इतका आहे. मुक्ताई शुगरने आतापर्यंत एक लाख ५३ हजार ५५५ टन उसाचे गाळप केले असून, एक लाख २७ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ८.३३ इतका आहे. सावेर (जि. धुळे) येथील दत्तप्रभू ॲग्रो या जॅगरी प्रकल्पात पाच हजार २०० टन उसाचे गाळप झाले आहे. खानदेशात बाहेरील बऱ्याच साखर कारखान्यांची ऊसतोड आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे