Jalgaon News : तरवाडे आरोग्य केंद्र ‘सलाईन’ वर; रुग्णांची उपचाराअभावी गैरसोय | Tarwade Health Center Not work properly Inconvenience of patients due to lack of treatment Complaints of non availability of medical officers Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tarwade (Chalisgaon) : Primary Health Centre.

Jalgaon News : तरवाडे आरोग्य केंद्र ‘सलाईन’ वर; रुग्णांची उपचाराअभावी गैरसोय

Jalgaon News : तरवाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असताना एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे औषध निर्माता व शिपायांसह इतर स्टॉप चालवतात प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णसेवेवर विपरीत परिणाम यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे पंधरा गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु या आरोग्य केंद्रात रुग्णांना वैद्यकीय अधिकारी अनेकदा हजर नसल्याने ताटकळत बसावे लागते. (Tarwade Health Center Not work properly Inconvenience of patients due to lack of treatment Complaints of non availability of medical officers Jalgaon News )

नाईलाजाने औषध निर्माता व नर्सिंग स्टाफकडून नाममात्र गोळ्या, औषधे देऊन परत पाठविण्यात येत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले.

वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा रुग्णांनी व इतर लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या असूनही याची दखल घेतली जात नाही.

तेच तालुका वैद्यकीय अधिकारी आता सध्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच दखल घेऊन रुग्णांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळण्याचे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रुग्ण काय म्हणतात...

या प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश वेळा सकाळी सातपासून दहा ते अकरापर्यंत थांबूनही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. याबाबत औषध निर्माण अधिकारी व इतर आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना विचारल्यास डॉक्टर केव्हा येतील हे आम्हाला माहीत नाही, असे उत्तर दिले जाते.

याशिवाय या आरोग्य केंद्राचा लाभ घेणारे सर्व रुग्ण गरीब कुटुंबातील असल्यामुळे तक्रार कुठे करावी, हे माहीत नसल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फावले आहे. लोकप्रतिनिधींनी भ्रमणध्वनीवर विचारणा केल्यास या अधिकाऱ्यांकडून रस्त्यात असल्याचे सांगितले जाते.

ठराविक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य व इतर लोकप्रतिनिधींचे सदस्य यांच्यासाठी हे वैद्यकीय अधिकारी तत्पर असतात. परंतु सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी रुग्णसेवा देण्यास हे लोक असमर्थ असल्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र असून, नसल्यासारखे आहे.

खरज‌ई गावात नुकतेच १४ लोकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला असता नाईलाजाने त्या रुग्णांना चाळीसगाव, धुळे येथे रवाना करण्यात आले. तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रामधून कोणत्याच प्रकारचा इलाज न झाल्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

"आम्ही दोन वैद्यकीय अधिकारी असून निम्मे निम्मे दिवस सेवा देतो. आम्ही रुग्णसेवेला सातत्याने प्राधान्य देत आलो आहे. एखादेवेळी काही कामानिमित्त रुग्णालयात उशीर होतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय कदाचित झाली असेल, यापुढे योग्य ती काळजी घेऊ. रिक्त पदे भरण्यासंदर्भातही वरिष्ठांकडे यापूर्वीच मागणी केली आहे."

- अजय राजपूत, वैद्यकीय अधिकारी, तरवाडे आरोग्य केंद्र (ता. चाळीसगाव)