शहरात रात्री संचारबंदी आणि चोरट्यांचा मुक्तसंचार; चोरीच्या घटना काही थांबेना

रईस शेख | Wednesday, 30 December 2020

पहाटेच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून चेारटा आत शिरतो, ड्रॉव्हरमधील रोकड लंपास करताना सीसीटीव्हीत चित्रण झाले

जळगाव ः दोन दिवसांपूर्वीच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठेत चार ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी  पुन्हा संचारबंदीतच दोन दुकाने फोडण्यात आली आहेत. पोलन पेठेतील ब्रिजविलास स्वीटमार्टसह एक लॉटरीचे दुकान फोडून ड्रॉव्हरमधील रोकड लंपास केली. 

शहरातील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी सतीश अग्रवाल यांचे पोलन पेठेत ब्रिजविलास स्वीटमार्ट आहे. दुकानाच्या शेजारीच रितेश व्यास (रा. पोलनपेठ) यांचे लॉटरीचे दुकान आहे. व्यास यांचे खाली दुकान आणि वरतीच घर आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास दोघेही दुकाने नेहमीप्रमाणे बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून स्वीटमार्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्क्रू-ड्रायव्हरच्या सहाय्याने ड्रॉव्हर तोडून अग्रवाल यांच्या दुकानातील गल्ल्यातून आठ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. तर शेजारीच व्यास यांच्या लॉटरी दुकानातून सात हजारांची रोकड चोरट्याने लांबविली. सतीश अग्रवाल नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी पोचल्यावर त्यांना मुख्य शटरचे लॉक तोडलेले आढळून आले. आत जाऊन बधितल्यावर रोकड लांबविल्याचेही आढळले. 

दुकानावर राहूनही अनभिज्ञ 
सकाळी रितेश व्यास यांचे वडील दुकानावर आले, त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले. विशेष म्हणजे व्यास कुटुंबीयांचे वरती घर आणि खाली दुकान आहे. पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली तरी देखील कुटुंबात कोणालाही आवाज आला नाही किंवा चाहूल लागली नाही. 

Advertising
Advertising

चोरटे सीसीटीव्हीत कैद 
पहाटेच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून चेारटा आत शिरतो, ड्रॉव्हरमधील रोकड लंपास करताना सीसीटीव्हीत चित्रण झाले असून, आपण सीसीटीव्हीत येतोय म्हणून त्या भामट्याने कॅमेराच फोडला, मात्र उपलब्ध पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत चोरट्याचा शोध सुरू केला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे