Jalgaon Crime News : भुसावळला भर दिवसा चोरी... रहिवाशांमध्ये घबराट | Thieves looted about 1 lakh worth of jewellery from house jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News : भुसावळला भर दिवसा चोरी... रहिवाशांमध्ये घबराट

Jalgaon Crime News : भुसावळला भर दिवसा चोरी... रहिवाशांमध्ये घबराट

Jalgaon Crime News : शहरातील तापी नगरातील चोपडे बिल्डिंगनजीक शालीन व्हिला अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून (Jalgaon News) चोरट्यांनी घरातून सुमारे एक लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना भर दुपारी घडली. (Thieves looted about 1 lakh worth of jewellery from house jalgaon crime news)

अत्यंत वर्दळीच्या व उच्च्भू वस्तीत चोरीची ही घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत माहिती अशी, येथील सदगुरु पेट्रोल पंपाचे मॅनेजर हरीश किशन मदनानी हे पत्नी रेखा यांच्यासह शहरातील ‘शालीन व्हिला’ या अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. श्री. मदनानी हे गुरुवारी (ता. ४) अकोला येथे कामानिमित्त गेल्याने पत्नी रेखा या घरी एकट्याच होत्या.

त्यांचा दात दुखत असल्याने त्या दुपारी एकच्या सुमारास सुमारास तापी नगर रिक्षा स्टॉपजवळील श्री डेंटल दवाखान्यात फ्लॅटला कुलूप लावून गेल्या. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ही संधी साधली. पॉश कपडे परीधान केलेले चार चोरटे स्वीफ्ट कारने अपार्टमेंटजवळ आले. त्यांच्यातील एकाने कार सुरू ठेवत पहारा दिला तर दुसऱ्याने अपार्टमेंटमधील जिन्यावर पहारा दिला.

अन्य दोघांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करीत घरातील तीन तोळे वजनाच्या व ७५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, बारा हजार पाचशे रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे टॉप्स व १२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे एक लॉकेट असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केला. साधारणतः २० मिनिटांनी रेखा मदनानी या दवाखान्यातील काम आटोपून फ्लॅटमध्ये परत आल्या असता, त्यांना दरवाजा उघडा दिसला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पती आल्याचे समजून त्या आतमध्ये शिरताच २५ ते ३० वयोगटातील चोरट्यांनी त्यांना धक्का देत, तेथून पलायन केले. यावेळी सौ. मदनानी यांनी ‘चोर चोर’ असा जोराने आवाज दिल्यानंतर अपार्टमेंटमधील नागरीक बाहेर आले. त्यांनी देखील चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणातच २५ ते ३० वयोगटातील चारही चोरटे स्वीफ्ट कारमधून भरधाव वेगाने पसार झाले.

चोरट्यांचा शोध सुरु

या चोरीची माहिती भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना कळताच पोलिस निरीक्षक गजानन पडघन व सहकाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले. घडलेला प्रकार त्यांनी जाणून घेतला. याबाबत रेखा मदनानी यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चौघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, भर दिवसा घडलेल्या चोरीच्या या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले असता, त्यात चारचाकीतून जाणारे चार चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्या वाहनाच्या नंबरप्लेटच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिस पथकाने नशिराबाद, फेकरी टोल नाक्यावरील ‘सीसीटीव्ही फुटेज’ देखील संकलीत केले आहेत. याशिवाय गांधी पुतळा तसेच यावल रोड भागातीलही ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले जात असून चोरटे लवकरच गजाआड होतील, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.