
Sakal Special News : 30 हजार दिव्यांगांना घरबसल्या ‘दाखले’; GMC मधील दिव्यांग बोर्डाची कामगिरी
Jalgaon News : दिव्यांगांना विविध सवलती दिल्या जातात; मात्र त्यांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागत होते. तासनतास रांगेत उभे राहूनही दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी वारंवार जिल्हा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात दिव्यांग बोर्डाने दिव्यांगांना घरबसल्या दिव्यांगाचे प्रमाणपत्रे देणे सुरू केल्याने दिव्यांग बांधवांची प्रमाणपत्रासाठीची वणवण थांबली आहे.
आतापर्यंत २९ हजार ८२१ दिव्यांग बांधवांना बोर्डाने घरबसल्या दाखले दिले आहेत. (Thirty thousand disabled people shown at home Performance of Divyang Board in GMC Stopped application for certificate of disabled persons Jalgaon News )
कोरोना महामारीची दुसरी लाट संपल्यानंतर कोरोना सोडून इतर आजारांसाठी ओपीडी सुरू झाली. २८ सप्टेंबर २०२१ ला दिव्यांग बोर्ड सुरू झाले. त्यापूर्वी प्रमाणपत्रासाठी येणाऱ्यांची अनियंत्रित गर्दी, दिव्यांग बांधवांचे होणारे हाल, तसेच काही दिव्यांग आदल्या दिवशीच मुक्कामाला येत होते.
असे निराशाजनक चित्र तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाहिले होते. हे विचित्र चित्र दूर व्हावे, अशी इच्छा दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांची होती. त्यामुळे डॉ. पोटे यांनी डॉ. रामानंद यांना कूपन प्रणाली सुरू करण्यासाठी सुचविले.
त्याची पूर्ण जबाबदारी डॉ. पोटे यांनी घेतली. त्यानंतर ४ ऑगस्टपासून २०० कूपन देण्यासाठी सुरवात केली. ऑक्टोबर २०२२ पासून २५० व आता एकूण तीनशे कूपन दिव्यांग बांधवांना वितरित होत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बुधवारी संबंधित दिव्यांग बांधवाला येऊन कूपन घ्यावे लागते. कूपन म्हणजे अपॉइंटमेंट मिळते. त्यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या तपासणीची तारीख आणि वेळ मिळते. त्या तारखेला त्यांची पूर्ण तपासणी होते. डॉक्टर संबंधिताला दिव्यांगाच्या प्रकार, तीव्रतेनुसार प्रमाणपत्र देतात. ते दिव्यांग बोर्डात जमा केल्यानंतर एक-दोन महिन्यांत संबंधिताला प्रमाणपत्र ऑनलाइन मिळते. ते त्यांना डाउनलोड करून प्रिंट काढता येते.
...असे मिळते यूआयडी कार्ड प्रमाणपत्र
दिव्यांगाचा ऑनलाइन फार्म भरणे, बुधवारी येऊन दिव्यांग मंडळात जमा करून टोकन घेणे, टोकनवरील तारखेला येऊन फार्म जमा करणे, तपासणी करून घेणे, त्यानंतर एक-दोन महिन्यांत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर दिव्यांगाचे यूआयडी कार्ड, प्रमाणपत्र तयार झाल्याचा संदेश येतो. तो आल्यानंतर ते डाउनलोड करून त्याचा वापर करता येतो.
"दिव्यांग बोर्डातर्फे प्रमाणपत्र देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. दिव्यांग बांधवांना कोणी बाहेरचा व्यक्ती लवकर प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून काही मागणी करीत असल्यास दिव्यांग बांधवांनी मला संपर्क साधावा. दिव्यांगाच्या तपासणीत बारीक बारीक गोष्टींची नोंद होते. त्यावरूनच प्रमाणपत्र दिले जाते."
-डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जीएमसी, जळगाव
व्याधीचा प्रकार - दिलेले प्रमाणपत्र
गतिमंद/मतिमंद - एक हजार १२०
अंध किंवा दृष्टिदोष - दोन हजार ६२७
आधारशिवाय हालचाल करू न शकणारे - १४ हजार ६५९
इतर - पाच हजार ६८७
मानसिक आजार - दोन हजार ६३५
एकूण - २९ हजार ८२१