Family Day Special : कुटुंबदिनी तीन पिढ्या आल्या एकत्र; 218 आप्तेष्टांचे स्नेहमिलन | Three generations of mahajan family come together on Family Day jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahajan Parivar's relatives gathered in large numbers for the Snehmeelan ceremony.

Family Day Special : कुटुंबदिनी तीन पिढ्या आल्या एकत्र; 218 आप्तेष्टांचे स्नेहमिलन

Jalgoan News : अमळनेर नगरीच्या सर्वांगिण विकासाचे शिल्पकार मानले जाणारे महाजन (वाघ) परिवारातील आठ बंधू आणि एक भगिनी असा नऊ जणांचा परिवार कित्येक दशके गुण्यागोविंदाने एकत्रित नांदला आहे. मात्र, धकाधकीच्या युगात एकत्र कुटुंब व्यवस्थाही खिळखिळी होताना दिसून येते. (Three generations of mahajan family come together on Family Day jalgaon news)

ही व्यवस्था टिकून राहावी, यासाठी तिसऱ्या पिढीतील तरुणांनी सर्वांना एकत्रित केले. नाशिक येथील पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टवर कुटुंब दिनाच्या पार्श्‍वभूमीवर स्नेहमिलन आयोजीत करून एकत्र कुटुंब पद्धती काळाची गरज असल्याचा संदेश दिला आहे. याप्रसंगी नऊ आजोळांच्या राज्यासह, देश- विदेशातील २१८ आप्तेष्टांनी हजेरी लावली हे विशेष!

(कै.) वामन बुधा महाजन, (कै.) ढोमण बुधा महाजन, (कै.) चिंतामण बुधा महाजन, (कै.) बाबूराव बुधा महाजन, (कै.) श्‍यामराव बुधा महाजन, (कै.) शिवलाल बुधा महाजन, (कै.) देवाजी बुधा महाजन, (कै.) बाजीराव बुधा महाजन आणि (कै.) चंद्रभागा बुधा महाजन हे आठ बंधू आणि एक भगिनी असा नऊ जणांचा एकत्रित परिवार होता.

आठही जणांनी मोलमजुरी करून प्रतिकूल परिस्थितीत व्यापार उद्योगात प्रगती भरारी घेऊन एक नावलौकिक मिळविला. कालांतराने (कै.) ढोमण महाजन व (कै.) देवाजी महाजन यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत पालिकेच्या माध्यमातून शहराचा कायापालट केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. सर्वच जण एका छताखाली राहून एकत्रित निर्णय घेत हे विशेष! साधारण १९५० च्या काळात त्यांनी निर्माण केलेल्या वाघ बिल्डिंग आजही खानदेशात प्रसिद्ध आहेत.

असे रंगले विविध कार्यक्रम

नाशिक येथील पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टवर झालेल्या स्नेहमिलन सोहळ्यात कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात धुळे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी सादर केलेल्या 'वर्‍हाड निघालंय लंडन'ला या एकपात्री प्रयोगाने उपस्थित आप्तेष्टांची मने जिंकली.

काही महिलांनी आजोळांच्या पोशाखातून ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. बालकांनी विविध नृत्याविष्कारातून सार्‍यांनाच थक्क केले. जमलेल्या आप्तेष्टांनी एकाच प्रकारचा परिधान केलेला गणवेष विशेष आकर्षण ठरले. एकत्र कुटुंब पद्धती लयास जात असताना सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी व्हावे, असा संकल्पही करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonfamily