Jalgaon News : मन्यारखेडा गावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

toilets in the rural areas in bad condition due to lack of water

Jalgaon News : मन्यारखेडा गावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

वरणगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी, घराघरांत शौचालय उभारणीसाठी अभियान सुरू केले आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या अभियानाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे. मन्यारखेडे येथे खासगी शौचालयाचा अभाव असून, सार्वजनिक शौचालयांचीही दुरवस्था झाल्याने या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुत्य उपक्रम व संकल्पनेनुसार देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई, स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जात असताना तालुक्यातील ९४० लोकसंख्या व ७ सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या लहानशा मन्यारखेड्यात अस्वस्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच गावातील बहुतांश नागरिकांकडे खासगी जागा नसल्याने त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहिवास सुरू केला आहे. यामुळे अशा नागरिकांना घरकुल व वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime : चोरीच्या पैशातून जंगी पार्टी करताना भामटा ताब्यात

यावर मार्ग काढण्यासाठी मागील सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून गावांत स्त्री पुरुषांसाठी विविध चार सार्वजनिक शौचालय उभारले खरे. सार्वजनिक शौचालयाची गत आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीचे देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी, नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा प्रकार निंदनीय असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. चारही शौचालयांना काटेरी झुडपांचा वेढा पडलेला आहे तर काहींची पडझड झाली आहे.

''गावात दीपनागर औष्णिक प्रकल्पाच्या सीएसआर फंडातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात गटारींची कामे दखील होणार आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत रोजंदारीवर आम्ही कामे करून घेतो, शौचालयाच्या दुरवस्थेसंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. निधी मिळाल्यास बांधकामे करणार आहे.''

- सीमा तायडे, ग्रामसेविका, मन्यारखेडा

हेही वाचा: Divorce Celebration: घटस्फोटीत पुरुषांसाठी जंगी सेलिब्रेशन पार्टी, निमंत्रण पत्रिका व्हायरल