Jalgaon Crime News : शिष्यवृत्तीत नापास करण्याचे धमकावून विद्यार्थिनीवर अत्याचार | Torture of student by threatening to fail in scholarship exam jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon Crime News : शिष्यवृत्तीत नापास करण्याचे धमकावून विद्यार्थिनीवर अत्याचार

Jalgaon Crime News : शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) आरोपी तथा खासगी क्लासचा शिक्षक तुषार शांताराम माळी (वय ३३, रा. नशिराबाद) याला मरेपर्यंत जन्मठेप व सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. माने (गाडेकर) यांनी दिला. (Torture of student by threatening to fail in scholarship exam jalgaon crime news)

आरोपी तुषार माळी याचा नशिराबाद परिसरात श्री समर्थ क्लास आहे. पीडितेच्या पालकांना भेटून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी क्लास माझ्याकडे लावा, मी तुमच्याकडून फी घेणार नाही, अशी गळ घालून पीडितेची इच्छा नसताना तिला आपल्या क्लासमध्ये शिकवणी लावण्यास भाग पाडले.

ऑगस्ट २०१७ पासून विद्यार्थिनीने क्लासला सुरवात केली. शिक्षक माळी विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचसाठी एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर तिच्याशी सलगी करीत असे. त्याने तिला एकदा घरात नेऊन अत्याचार केला.

डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान होत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करेल, अशी धमकी देऊन पीडितेवर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. पीडितेसोबत मोबाईलमध्ये काढलेले छायाचित्र काढून ते लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल, अशीही धमकी देत होता. त्यामुळे ही घटना विद्यार्थिनीने कुणाला सांगितली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मार्च २०१८ मध्ये पीडित विद्यार्थिनीचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावात खासगी रुग्णालयात दाखविले. त्यावेळी पीडिता गर्भवती असल्याची बाब समोर आली. विश्वासात घेतल्यावर तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. १७ मार्च २०१८ ला नशिराबाद पोलिस ठाण्यात तुषार माळी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(एफ)(आय)(एन) ५०६ प्रमाणे व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३ (अ), ४, ५ (ज)(२), ५ (एल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

१६ साक्षीदार तपासले

जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. माने यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित विद्यार्थिनी, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. पीडितेने गुदरलेला प्रसंग साक्षीतून मांडला.

न्यायालयासमक्ष आलेलया संपूर्ण घटनाक्रम आणि पुराव्याअंती तुषार माळी याच्यावर दोषारोप निश्‍चित करून गुरुवारी (ता. ११) माळीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सहाय्यक सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी म्हणून आर. एन. खरात यांनी, तर न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून नरेंद्र मोरे, विजय पाटील, गुणवंत सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

अशी कलमे अशी शिक्षा

-भादंवि कलम ३७६ (२) (एफ) व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३, ४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद

-भादंवि कलम ३७६ (२) (आय) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ३, ४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद

-भादंवि कलम ३७६ (२) (एन) प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद

-बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद

-भादंवि कलम ५०६ प्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधा कारावास

-दंडाच्या पूर्ण रक्कमेतून ५० टक्के रक्कम पीडित विद्यार्थिनीला देण्याचे आदेश