
Jalgaon News : मनपाचे अंगकाढू धोरण; आयुक्त मॅडम, रस्त्यांवरील खोदकामांना ‘फुलस्टॉप’ कधी?
जळगाव : नव्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर, तर काहींची प्रस्तावित असताना, या रस्त्यांवरील खोदकामांना (Digging) अद्याप ‘फुलस्टॉप’ लागलेला नाही. (Under name of Amrit scheme digging of roads is going on rampantly jalgaon news)
आजही विविध प्रमुख रस्त्यांवर १५ दिवस, महिनाभरापासून मोठे खड्डे खोदून ठेवली असून, ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. ‘अमृत’ योजनेच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सर्रास सुरूच आहे.
याबाबत नगरसेवक कुणाला जाब विचारताना दिसत नाहीत, तर महापालिकेचे अभियंतेही खोदकाम कधी बंद होईल, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे आता खोदकाम थांबणार कधी अन् रस्त्यांची कामे कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.
जळगाव शहरात गेल्या सहा ते सात वर्षांपासून ‘अमृत’ अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. पैकी भुयारी गटार योजना ‘टप्पा-एक’चे काम प्रकल्प वगळता पूर्ण झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. वारंवार हे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील प्रमुख भागांत या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्याचे काम अद्यापही सुरूच आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
काम कधी पूर्ण होणार?
या सर्व पाश्र्वभूमीवर सात वर्षांपासून शहरातील रस्त्यांची वाट लागली असून, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पैकी ४२ कोटींची कामे सुरूही झाली असून, काही रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यांवर अद्याप कारपेट, सीलकोटचे थर बाकी आहेत.
असे असूनही महापालिका प्रशासनाकडून ‘अमृत’ योजनेच्या नावाखाली नव्याने झालेल्या व प्रस्तावित असलेल्या रस्त्यांवर वारंवार कुठे ना कुठे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण तरी कधी होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय.
‘ती’ सर्व कामे बांधकाम विभागामार्फत होताय
शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवरून महापालिकेसह या रस्त्यांचे काम करणाऱ्या यंत्रणा टार्गेट होताय. सध्या ज्या ४२ कोटींच्या निधीतून कामे होत आहेत, ती सर्व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहेत. या कामांच्या दर्जाबाबतही तक्रारी समोर येत आहेत. या रस्त्यांची कामे घेतलेले कंत्राटदार आतापर्यंत २७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा करीत असून, तो खराही आहे. मात्र, या रस्त्यांवर अद्याप सीलकोटचा थर बाकी आहे.
सध्या या रस्त्यावर मोठे खड्डे
काव्यरत्नावली चौक ते महाबळ व पुढे संभाजीनगरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खोदकाम सुरू आहे. सध्याही या मार्गावर भाऊंच्या उद्यानासमोर दोन ठिकाणी, मायादेवी मंदिराजवळ व नगरसेवक नितीन बरडे यांच्या घरासमोर मोठाले खड्डे करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून ते तसेच आहेत. या खड्ड्यांच्या ठिकाणी ना मजूर दिसतात, ना काम करणारी यंत्रणा.
या रस्त्यावरील खोदकामाबाबत विचारले; मनपा अभियंत्यांची उत्तरे आश्चर्यकारक!
काव्यरत्नावली चौक ते महाबळपर्यंतच्या रस्त्यावर आजही तीन ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले असून, ते अनेक दिवसांपासून तसेच आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याचे काम सुरू होऊ शकत नाही, असे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. हे खोदकाम थांबणार कधी, असा प्रश्न ‘सकाळ’च्या वतीने विचारला, त्यावर मनपातील अभियंत्यांनी दिलेली उत्तरे आश्चर्यकारक व संताप आणणारी आहेत. ती अशी :
"पाणीपुरवठ्याचा विषय आहे, याबाबत आपल्याला अभियंता संजय नेमाडेच अधिक माहिती देऊ शकतील. सध्यातरी ‘अमृत’च्या सर्व जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. जोडण्यांचे काम तेवढे बाकी असून, त्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे." -योगेश बोरोले, अभियंता, अमृत प्रकल्प
"काव्यरत्नावली चौक ते महाबळ रस्त्याचे डांबरीकरण सुरू होणार आहे. त्याआधी जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाले असून, खड्डे बुजविले आहेत. आजही खड्डे तसेच आहेत, हे सांगितल्यावर ‘हो का? बघतो, तपास करून सांगतो..’ असे श्री. नेमाडे म्हणाले." -संजय नेमाडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग