Unseasonal Rain : वादळीवाऱ्यासह ‘अवकाळी’ने हिरावला घास; गहू, मक्यासह रब्बीची पीक जमिनदोस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uprooted maize crop in the field.

Unseasonal Rain : वादळीवाऱ्यासह ‘अवकाळी’ने हिरावला घास; गहू, मक्यासह रब्बीची पीक जमिनदोस्त!

जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी (ता. ६) रात्री वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने (Rain) हजेरी लावली. यात काही ठिकाणी गहू, मका पीक आडवे झाले. तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (unseasonal rain Rabi with wheat maize crop damage jalgaon news)

बेमोसमी पावसामुळे मक्याचे झालेले नुकसान आणि वादळामुळे नुकसानग्रस्त गव्हाचे पीक.

बेमोसमी पावसामुळे मक्याचे झालेले नुकसान आणि वादळामुळे नुकसानग्रस्त गव्हाचे पीक.

या वादळी पावसाने रब्बीचा हंगाम हातचा गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने तो घरातच पडून आहे. रब्बी हंगाम जोरात होता. मात्र अवकाळी वादळी वाऱ्यामुळे तीही आशा आता मावळली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

धरणगाव तालुक्यात सोमवारी (ता. ६) सायंकाळी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मात्र प्रचंड वादळ वाऱ्याने परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे धरणगाव शिवारात एका शेतात नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले.

मात्र जवळ कुणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, अंजनी परिसरातील हिंगोणे, पिंप्री कल्याणे खुर्द, कल्याणे होळ, भोद परिसरात मका, गहू पिके वादळ वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. कल्याण खुर्द येथील पंढरीनाथ बोरसे यांच्या दोन एकर शेतातील मका जमीन दोस्त झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वावडे परिसरात नुकसान

परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात वावडे, जवखेडे, मांडळ, मुडी, लोण, भरवस आदी भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यास सुरवात झाली. आणि विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाळा सुरवात झाली. वादळी वाऱ्यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. गहू, हरभरा, मका, केळी, टमाटे, आदी शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

आडगावला पंचनाम्याची मागणी

परिसरात अवकाळीने रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. यात कोरडवाहू हरभरा, बागायती गहू, मका, ज्वारी, सूर्यफूल आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन सरसकट पंचनामे करावे व शासनाच्या वतीने भरीव मदत शेतकऱ्यांना मिळून द्यावी,

अशी मागणी आडगावचे सरपंच सुनील भिल, उपसरपंच दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार, प्रल्हाद पाटील, भय्या पाटील, भय्या वणवे, युवराज साबळे, अमोल पाटील, प्रवीण पाटील आदींनी केली आहे.

शेवगे बुद्रुकला मका आडवा

परिसरात अवकाळी पावसामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक पूर्ण आडवे झाल्याने परिपक्व असलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घात हिरावला आहे.