
Unseasonal Rain Crop Damage : भुसावळसह 3 तालुक्यांत 1880 हेक्टरवर नुकसान; प्रशासनाचा प्राथमिक अहवाल
Jalgaon News : भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात २७ ते ३० एप्रिल यादरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. केळी, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग यासह विविध पिकांचे सुमारे १८८० हेक्टरवर नुकसान झाले आहे. (unseasonal rain Various crops were damaged on about 1880 hectares bhusawal jalgaon news)
यासह घराची पडझड, जनावरे दगावल्याने अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगर तालुक्यात झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, प्रशासनाने तालुकानिहाय प्राथमिक अहवाल ३ मेपर्यंत पूर्ण करून तहसीलदारांकडे सादर केला आहे.
भुसावळ तालुक्यातील २७ ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी व गारपीटसह वादळी वाऱ्यामुळे कांदा पिकाचे एकूण १५५ शेतकऱ्यांचे ९६.२९ क्षेत्र हेक्टर, लिंबू ११८ शेतकऱ्यांचे १०३.४२ क्षेत्र हेक्टर, मका २७ शेतकरी ३३.३९ क्षेत्र हेक्टर, पपई १२ शेतकरी ६.८६ क्षेत्र हेक्टर, टरबूज ६ शेतकरी २.४० क्षेत्र हेक्टर, केळी ६५ शेतकरी ६१ क्षेत्र हेक्टर, आंबा १ शेतकरी १.०० क्षेत्र हेक्टर, बाजरी १२ शेतकरी ७.१० क्षेत्र हेक्टर, दादर २४ शेतकरी ८.७६ क्षेत्र हेक्टर असे एकूण ४२० शेतकरी व ३१९.८७ क्षेत्र हेक्टर भुसावळ तालुक्यात नुकसान झाले.
बोदवडला ५६ घरांची पडझड
बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका, सूर्यफूल, कांदा तसेच फळपिका केळी, पपई असे पिकांचे एकूण २५१.९६ क्षेत्र हेक्टर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे घरांच्या नुकसानीत काही घरांचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये बाधित घरांची संख्या ५६ असून, अंशतः ५६ असे आहे. तर एकही जनावरे दगावलेली नसून जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मुक्ताईनगरला १३१० हेक्टरवर नुकसान
मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, केळी असे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एकूण १३१० क्षेत्र हेक्टर आहे. घरांचे नुकसानीत बाधित घरे ३५ तर अंशतः ३३, पूर्णतः २ असे आहे. या दरम्यान दगावलेली जनावरे २ असून, ३ मेपर्यंत पंचनामा पूर्ण झाल्याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील भाग भुसावळ यांनी प्रसार माध्यमांना दिली.
तब्बल २८ तास नागरिक अंधारात
वादळामुळे शनिवारी सायंकाळी साडेचारपासून शहरातील दक्षिण भागातील वीजपुरवठा बंद झालेला होता. श्रीनगर भागातील नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत होण्याची २४ तास वाट पाहिली. श्रीनगर भागात निव्वळ एक तार तुटलेली असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी २८ तासांत येऊन सुद्धा पाहिले नाही.
नागरिकांनी फोन लावल्यावर आज काम होणार नाही, उद्या लाईट येईल, अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. काम छोटेसे असतानाही त्याकडे दुर्लक्ष त्यांनी केले. वीज बंद त्यातच पाण्याचे रोटेशनही चुकलेले असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास असह्य झाला. कर्मचारी येत नसल्याने शेवटी नाईलाजाने शेवटी नागरिकांनी स्वतः खासगी वीज सहायकाच्या मदतीने स्वखर्चाने वीजतारा जोडल्या.
विशेष म्हणजे, हे कार्य सुरू असताना त्याच ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन यांनी भेट दिली. ‘महावितरण’चे कर्मचारी पाठवतो, असे सांगून ते तिथून निघून गेले. परंतु रात्री आठपर्यंत कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही. २४ तासाच्या आत वीजपुरवठा सुरू करणे बंधनकारक असल्यावर सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.