‘अंतरी पेटवू राजकारण..!’

‘अंतरी पेटवू राजकारण..!’

जळगाव ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कार्यकाळ संपण्यपूर्वीच राजीनामा देणं ही विद्यापीठ स्थापनेपासून आजपर्यंतची ऐतिहासिक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. या घटनेचे पडसाद उमटताना दोन्ही बाजूंनी झालेले आरोप- प्रत्यारोप शिक्षण क्षेत्रातील राजकारणाची काळी बाजू अधोरेखित करतात. 


स्थापनेनंतर अल्पावधीत विद्यापीठाने देशव्यापी शैक्षणिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलाय, हे निसंदिग्धपणे मान्य करणे जसे क्रमप्राप्त ठरते, तशी या विद्यापीठाची वाटचाल खूप काही देदिप्यमान अशी झालीय, असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण या वाटचालीत विद्यापीठाच्या नशिबी असे काही प्रसंग, घटना आल्यात की त्यामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला त्या-त्या वेळी तडाच गेला. 

वादा नंतर ही प्रगती वाटचाल

सुरवातीच्या काळात घडणारे परीक्षांमधील घोळ, संशोधनातील वाङ्‍मयचौर्य, त्याची चौकशी, काही कुलगुरूंचा वादग्रस्त कार्यकाळ, संस्थाचालक आणि विद्यापीठ प्रशासनातील तत्कालीन वाद अशा काही घटना उदाहरणादाखल देता येतील. पण त्यातूनही तावून सुलाखून निघत विद्यापीठाने प्रगती सुरूच ठेवली. तुलनेत विद्यापीठाच्या वाटचालीत सकारात्मक बाबींची यादी यापेक्षा मोठीच असेल, याबद्दलही शंका नाही. 

‘ॲडमिन बिल्डिंग’ला डाग
विद्यमान कुलगुरू प्रा.डॉ. पी. पी. पाटील यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देणे, या आणखी एका प्रसंगाने आतापर्यंतच्या प्रवासातील दुर्दैवी घटनेचाही विद्यापीठाच्या ‘ॲडमिन बिल्डिंग’ला डाग लागला. पाटील सरांचा राजीनामा रात्रीतून ‘अचानक’ झालेला नाही. ते सहा महिन्यांपासून अस्वस्थ होते, त्यातून त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते पूर्णसत्य नाही. राजीनामा नाट्यातील पूर्णसत्य बाहेर येणे तसे कठीण आहे, पण ते जाणून घेण्यासाठी कुलगुरूंच्या नियुक्तीपर्यंत मागे जावे लागेल.

सल्लागारांचा हस्तक्षेप..? 
कुलगुरूपदासाठी पाटील सर पात्र होते, त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पण, त्यांच्या नियुक्तीच्या वेळी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत होते, राज्यपालही त्या विचारांचे आणि त्या विचारांच्या संघटनेच्या प्रयत्नांनी पाटील सरांचे नाव निश्‍चित झाले, हे लपून राहिलेले नाही. तेव्हापासून कुलगुरूंभोवती सल्लागार गोळा झाल्याचे बोलले जात होते. किंबहुना आता त्यांच्या राजीनाम्यानंतर तर या ‘सल्लागारां’च्या हस्तक्षेपामुळे त्यांना हा पवित्रा घ्यावा लागला, असाही आरोप होत आहे. अर्थात, हा युक्तिवादही एकतर्फीच आहे. कारण गेल्या वर्षापर्यंत सर्व काही सुरळीत होते. राज्यात सत्तांतर झाले आणि कुलगुरुंविरुद्ध तक्रारीही वाढल्या. काही संघटनांनी त्यांच्यावर थेट आरोप करणे सुरू केले, आणखीही अनेक प्रकार घडल्याचे उघड आहे. मुळात, पाटील सर अगदीच सरळमार्गी व्यक्ती. साडेचार वर्षे कारभार सांभाळताना त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. काही चांगल्या योजना, प्रकल्पांसाठीही त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरलेत. मात्र, विद्यापीठासारख्या संस्थेत सर्वोच्चपदी काम करताना केवळ प्रामाणिकता अन्‌ शैक्षणिक पात्रतेवर ‘परफेक्ट’ असून चालत नाही, प्रशासक संस्था चालविण्यासाठीचे डावपेचही अंगी असावे लागतात. ते त्यांच्याअंगी नाही, हे स्पष्टच आहे. त्यामुळे नियुक्तीनंतर कथित सल्लागारांचे ऐकणे असो की, राज्यातील सत्तांतरानंतर मंत्री अन्‌ शासनाचा हस्तक्षेप वा संघटनांचा दबाव असो.. ही सर्वच प्रकरणे हाताळताना प्राध्यापक, संशोधक म्हणून परिपूर्ण असलेले पाटील सर प्रशासक म्हणून कमी पडले, हे मान्य करावे लागेल. 

‘प्रकृती अस्वास्थ्या’चे कारण
कुलगुरूंनी राजीनाम्यावर ‘प्रकृती अस्वास्थ्या’चे कारण दिले असले तरी, एकूणच विद्यापीठ कार्यक्षेत्राचे आरोग्य ठीक नाही, हेच यातून दिसून येते. कुणी तर या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केलीय.. ती योग्यही आहे. राजभवनाने कुलगुरूंचा राजीनामा मंजूर करताना फेकून दिलेल्या रिक्त लिफाफ्यातून शैक्षणिक वर्तुळात जो संदेश गेलांय, तो ‘अंतरी पेटवू ज्ञानज्योत’ यापेक्षाही ‘अंतरी पेटवू राजकारण..’ असा दुर्दैवी आहे, असे खेदाने नमूद करावे लागेल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com