jalgaon : ‘निसाका’साठी लक्ष घालणार ; शरद पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

‘निसाका’साठी लक्ष घालणार ; शरद पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : साखर उद्योगात साखरेसोबत वीज, इथेनॉल, हायड्रोजन प्रकल्प सुरू केल्यास साखर कारखाने दोनशे रुपये प्रतिटन अधिकचा दर उसाला देऊ शकतील. ‘रासाका’चे शिवधनुष्य पेलण्याची इच्छाशक्ती आमदार दिलीप बनकर यांनी दाखविली. माझी त्यांना सदैव मदत राहील, तुम्ही बनकरांना साथ द्या. ‘रासाका’पाठोपाठ ‘निसाका’ सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ब्राझीलसह परदेशात उसाचे उत्पादन घटल्याने साखरचे दर वधारून भारतातील ऊस उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन पैसे अधिक मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला.

रानवड येथील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी रविवारी (ता.१४) ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी, तर कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते. श्री. पवार म्हणाले, की कर्मवारी काकासाहेब वाघ यांच्या कर्तृत्व व नेतृत्वाने मुहूर्तमेढ रोवली गेलेला रासाका बंद पडला ही बाब चांगली नाही. मी अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या सल्ल्याने रासाका सुरू करण्यासाठी आमदार बनकर यांनी योग्य दिशेने पावले टाकली. साखर कारखानदारी ऊर्जिततावस्थेत आणण्यासाठी उपउत्पादने स्त्रोत करा. ब्राझीलमध्ये शंभर कामगारांवर ३५ हजार टन क्षमता असलेले साखर कारखाने चालतात, तोच आदर्श ठेवून आवश्‍यक तेवढ्या कामगार व खर्चात काटकसर केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा भाव, कामगारांना योग्य मोबदला देता येईल, असा सल्ला त्यांनी दिला.

तुमच्या उसाचं काय झाले ते पाहा

श्री. पवार यांनी शेतकऱ्यांचे कान अतिशय संयतपणे टोचले. ते म्हणाले की, स्व. अशोक बनकर पतंसस्थेच्या माध्यमातून साखर कारखाना कार्यान्वित करण्याचे आव्हान आमदार बनकर यांनी स्वीकारले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे. मोदींचे काय चाललंय, यापेक्षा तुमच्या उसाचं काय झालं हे पाहा. राजकीय चर्चावर गप्पा मारण्यावर वेळ खर्च न करता द्राक्षाप्रमाणे लक्ष घालून उसाचे चांगले उत्पादन घ्यावे. उसाचे पीक आळशीपणाचे लक्षण न ठरू देता उत्पादन, उतारा वाढवा. रासाकाचे सूत्रधार बनकर यांची पाठराखण करून कामगार, शेतकरी यांनी तुटेपर्यत ताणू नये, अन्यथा संस्थांना टाळे लागतात.

‘निसाका’चा आशेचा किरण

‘रासाका’प्रमाणे ‘निसाका’ सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. त्याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून माहिती घेणार आहे. निफाडचे साखर कारखान्यातील जाणकार, आमदार दिलीप बनकर यांच्यासह माझ्या भेटीला या. ‘निसाका’ ही सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देताना पुन्हा एक आशेचा किरण ऊस उत्पादकांसाठी पवार यांनी दाखविला. शेतकऱ्यांच्या वीज प्रश्‍नावरही अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

loading image
go to top