Jalgaon Crime News : गोलाणी मध्ये तरुणास मारहाण करून लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : गोलाणी मध्ये तरुणास मारहाण करून लुटले

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये ‘जे. जे. पॅरामेडिकल्स ॲन्ड नर्सिंग इन्स्टिट्यूट’ नावाची संस्था चालवणाऱ्याची रात्री साडेअकराच्या सुमारास लूट करण्यात आली.

रिक्षातून आलेल्या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोबाईल आणि संगणक दुरुस्तीचे सामान ठेवलेली बॅग हिसकावून (Robbery) रिक्षाने पाय चिरडत पळ काढल्याची घटना घडली. (youth Beaten and robbed in Golani jalgaon crime news)

या प्रकरणी केजाद नवरोज जलगाववाला यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुरुवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास केजाद जलगाववाला आपल्या गोलाणी मार्केट येथील कार्यालयात संगणकाचे सामान ठेवण्यासाठी गेला होता. त्या वेळी रिक्षाने आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्याकडे पैसे मागितले.

आपल्याकडे केवळ दहा रुपये असल्याचे त्याने तिघांना सांगितले. पुढच्याच क्षणी एकाने त्याच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. केजादच्या खिशात पैसे नसल्याने तिघांनी मोबाईल हिसकावून घेतला. तर एकाने त्याची मान धरून ठेवत बॅग हिसकावली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यात केजादचा डोळा सुजला. त्यानंतर ज्या रिक्षाने तिघे आले, त्याच रिक्षाचे चाक त्याच्या पायावरून नेल्याने पंजा सुजला. ५३ हजारांचे साहित्य हिसकावून नेण्यासह मारहाण करून पळून जाणाऱ्या तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार उमेश भांडारकर अधिक तपास करत आहेत.

‘गोलाणी’तील उपद्रव थांबेना!

शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोनशे मीटरवर आणि महापालिका प्रशासकीय इमारतीच्या थेट मागेच असलेले गोलाणी मार्केट गुन्हेगारीचा अड्डा बनले आहे. चोरी, जबरी लूट, अनैतिक व्यापार आणि तृतीयपंथीयांच्या हाणामाऱ्या हे येथील नित्याचे प्रकार झाले आहेत.

मार्केटच्या मोकळ्या गाळ्यांमध्ये चालणारे गैरप्रकार, दारूड्यांच्या मैफली, धिंगाण्याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही. याच मार्केटमध्ये गेल्या वर्षी एका तरुणाला मध्यरात्री चौथ्या मजल्यावरून फेकून त्याचा खून करण्यात आला होता.