दारूबंदीने वाचली संसारासह पाण्यासाठीची पायपीट

संदेश सप्रे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

संगमेश्‍वर - दारूबंदी झाली, दारूवर खर्च होणारे पैसे बचत होऊ लागले, बचतीतून पैसे साठत गेले आणि त्यातून पाणी योजना राबविण्यात आली. दारूबंदीच्या आजवर माहीत असलेल्या फायद्यांपेक्षा हा आणखी एक वेगळा फायदा होऊ शकतो, याचा पडताळा आरवलीजवळच्या खेरशेत गावातील बेंडलवाडीने दिला आहे. यामुळे पाण्यासाठी तडफडणारी ही वाडी स्वयंपूर्ण झाली आहे. दारूबंदीचे शारीरिक फायदे व सामाजिक पडसाद यापलीकडचा हा फायदा ठरला.

संगमेश्‍वर - दारूबंदी झाली, दारूवर खर्च होणारे पैसे बचत होऊ लागले, बचतीतून पैसे साठत गेले आणि त्यातून पाणी योजना राबविण्यात आली. दारूबंदीच्या आजवर माहीत असलेल्या फायद्यांपेक्षा हा आणखी एक वेगळा फायदा होऊ शकतो, याचा पडताळा आरवलीजवळच्या खेरशेत गावातील बेंडलवाडीने दिला आहे. यामुळे पाण्यासाठी तडफडणारी ही वाडी स्वयंपूर्ण झाली आहे. दारूबंदीचे शारीरिक फायदे व सामाजिक पडसाद यापलीकडचा हा फायदा ठरला.

काही वर्षांपूर्वी खेरशेत-बेंडलवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. या वाडीच्या पाणी समस्येकडे ना प्रशासन लक्ष देत होते, ना स्थानिक लोकप्रतिनिधी. दरम्यान, दारूमुळे येथील अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत होते. आधीच पाण्यासाठी वणवण आणि त्यात दारूची भर. यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत येथे दारूबंदीचा अभिनंदनीय निर्णय घेतला. याला महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. यातून या गावात ३५ वर्षांपूर्वी दारूबंदी केली. दारूसाठी खर्च केले जाणारे पैसे बचत करण्याची सवय येथील ग्रामस्थांना लावली. 

खेरशेत गावातील ग्रामस्थांनी दारूबंदी करीत त्यातून बचत झालेल्या पैशांचा उपयोग वाडीतील पाणीटंचाई मिटवण्यासाठी केला. यासाठी त्यांनी श्रमदानही केलेच. पण एखादी वाईट गोष्ट बंद करून त्याचा कसा चांगला उपयोग होतो हेच यातून सिद्ध झाले आहे. इतर गावातील ग्रामस्थांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
- सुरेश भायजे, 

सामाजिक कार्यकर्ते, आरवली

गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा झाला. मात्र याकडे दुर्लक्षच करण्यात आले. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरत असताना पाच महिला विहिरीत पडल्या. चारजणी वाचल्या. त्यापैकी दर्शना आग्रे ही ३३ वर्षांची महिला मृत झाली. या घटनेने वाडीवर शोककळा पसरली. 

घटनेनंतर लोकप्रतिनिधी धावत आले. मात्र स्वतंत्र विहिरीचे आश्‍वासन पूर्ण झालेच नाही. येथेच वाडीसाठी स्वतंत्र 
पाणीयोजना करण्याची ठिणगी पडली. बेंडलवाडीतील ३५ कुटुंबीयांनी एकत्र येत श्रमदान केले. तोपर्यंत दारूबंदीतून आणि सामाजिक कार्यासाठी काढलेले ३५ लाख रुपये जमा झाले होते. या रकमेतून नव्या विहिरीसह नवी नळ-पाणी योजना कार्यान्वित केली. गावाच्या एका निर्णयाने आणि वाडीतील ग्रामस्थांच्या एकीने येथील पाणीप्रश्‍न कायमचा निकाली निघाला. 

योजनेचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भायजे यांनी उद्‌घाटन केले. या वेळी जि. प. सदस्या पूनम चव्हाण, माजी उपसभापती संतोष चव्हाण, चंद्रकांत जाधव, सरपंच संतोष मोरे आदी उपस्थित होते. वाडीतील सोमा बेंडल, चंद्रकांत बेंडल, रघुनाथ बेंडल, भार्गव फेफडे, नारायण आग्रे, घाणेकर आदींनी मेहनत घेत नळपाणी योजना तयार केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News ban on wine drink special story