सात जन्मांध असलेल्या कुटुंबाची नेत्रदीपक कामगिरी

नागेश पाटील
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

चिपळूण - कुटुंबात सात जन्मांध असूनही त्यापैकी एकानेही दया, सहानुभूती कशाचीही अपेक्षा केली नाही. दोन पिढ्यांतील अंधांचे संसार डोळसपणे झाले. डोळस व्यक्तींना लाजवेल अशा स्वाभिमानाने आणि स्वतः श्रम करून दोन्ही पिढ्या जगत आहेत.

चिपळूण - कुटुंबात सात जन्मांध असूनही त्यापैकी एकानेही दया, सहानुभूती कशाचीही अपेक्षा केली नाही. दोन पिढ्यांतील अंधांचे संसार डोळसपणे झाले. डोळस व्यक्तींना लाजवेल अशा स्वाभिमानाने आणि स्वतः श्रम करून दोन्ही पिढ्या जगत आहेत. सुदैवाने पहिल्या पिढीत आणि दुसऱ्या पिढीत बायकोची खंबीर साथ मिळाल्याने सारे कुटुंब स्वावलंबी आहे. त्यांना अभिमानाने जगण्यासाठी नॅबचेही सहकार्य मिळाले आहे.

तालुक्‍यातील कोसबी गोताडवाडी येथील रामदास गुजर यांच्या कुटुंबीयांची ही कहाणी. रामदास गुजर यांच आई-वडील डोळस होते. गुजर यांना 7 बहिणी. त्यापैकी तिघी व स्वतः रामदास हे जन्मांध.या साऱ्यांचे विवाह डोळस व्यक्तींशी झाले.

1970 मध्ये रामदास गुजरांचा विजया यांच्याशी विवाह झाला. त्यांचे दोन मुलगे व एक मुलगी जन्मतःच अंध. संदीप, संतोष, विनया अशी त्यांची नावे. त्यांना दृष्टी येण्यासाठी विजया गुजर यांनी प्रचंड मेहनत घेतली. मात्र पदरी निराशा आली. तरीही त्या खचल्या नाहीत. खंबीरपणे प्राप्त परिस्थितीचा मुकाबला केला. मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकवले. जिद्दीने जगायलाही शिकवले. संतोषचे नववी, तर संदीपचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. तीनही मुलांना डोळस जीवनसाथी मिळाले. घरातील सर्वजण शेती करतात. नांगरणी व लावणीसाठी ग्रामस्थ मदत करतात. दोन एकरात दीड खंडी भात घेतात. ते कुटुंबाला पुरते.

व्हिडिआे पहाण्यासाठी लिंक क्लिक करा -

जोडधंदा म्हणून त्यांनी नॅबच्या सहकार्याने दुग्धव्यवसायही सुरू केला. त्यासाठी नॅबचे जनसंपर्क अधिकारी संदीप नलावडे यांची मोलाची मदत झाली. आज त्यांच्याकडे 10 म्हैशी आहेत. संदीप गुजर हे म्हशींची देखभाल करतात. संतोष सावर्डेत 10 वेगवेगळ्या कुटुंबास दूध घालतात. म्हशीच्या गळ्यातील घुंगरू, घंटा यांच्या नादाच्या साह्याने त्यांना रानात चरवायला नेतात व परत आणतात. दाणापाणीही करतात. अगदीच अडचण आल्यास पत्नी मदत करते. सकाळी 7 वाजताच दूध घेऊन संतोष बाहेर पडतात. दूध नवीन ठिकाणी घालायचे असेल, तर एकदा दाखवावे लागते. मग अडचण नाही. नॅबने या कुटुंबीयांचा जिल्ह्यात पहिला अंध व्यक्तींचा बचत गट स्थापन केला. त्यामार्फत सावर्ड्यात छोटा स्टॉल व हॉटेल चालवतात. त्यांच्याकडे खासगी तसेच शासकीय कार्यालयातील डबे व जेवणावळीसाठी मागणी असते.

अंधत्वाचा विचार केला तरी अंगावर शहारे येतात. देवाकडे आमचे एकच मागणे, कोणाही व्यक्तीला अंधत्व नको. आमचे जे आहे ते स्वीकारून कष्ट करून कुुटुंबाची गुजराण सुरू आहे. नॅबसह सर्वांचे सहकार्याने आम्ही स्वाभिमानाने जगतो.

- संतोष गुजर, कोसबी

नॅबने त्यांना घरघंटीही दिली. रामदास घरघंटी चालवतात. वाडीतील ग्रामस्थांची दळणे तेच देतात. या कामात सुनाही मदत करतात. या दोन्ही भावांमध्ये काही कमतरता आहे, असे आम्हाला कधीच वाटले नाही, असे दोघींनीही आवर्जून सांगितले. सुदैवाने या दोघा भावांची मुले उत्तम दृष्टी असलेली आहेत. मोठी मुलगी तर इंजिनिअर होते आहे. गावाचीही साथ मिळते, असे गुजर कृतज्ञतेने सांगतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News story of seven blind persons family