रायपाटणमध्‍ये वृद्ध दाम्पत्याने खोदली १५ फूट खोल विहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

राजापूर - निर्धार आणि ध्येयाने पछाडलेल्या वयाची साठी पार केलेल्या दाम्पत्याने तरुणांना लाजवेल असे काम केले आहे. तालुक्‍यातील रायपाटण येथील  शशिकांत आणि शशिकला पांचाळ या  दाम्पत्याने अंगमेहनतीने पंधरा फूट विहीर खोदली आहे.

राजापूर - निर्धार आणि ध्येयाने पछाडलेल्या वयाची साठी पार केलेल्या दाम्पत्याने तरुणांना लाजवेल असे काम केले आहे. तालुक्‍यातील रायपाटण येथील  शशिकांत आणि शशिकला पांचाळ या  दाम्पत्याने अंगमेहनतीने पंधरा फूट विहीर खोदली आहे.

सध्याच्या यंत्रयुगामध्ये पोकलेन वा जेसीबीच्या साह्याने खोदकामे केली जात असताना पांचाळ  दाम्पत्याने मात्र, अंगमेहनत करताना टिकावाच्या साह्याने विहीर खोदली हे विशेष. या विहिरीमध्ये सध्या दोन फूट पाणीसाठा 
झाला असून त्यातून पांचाळ  दाम्पत्याची आंबा-काजूची बाग अधिक फुलणार आहे.  

रायपाटण येथील शशिकांत आणि शशिकला दाम्पत्याची घरापासून काही कि.मी. अंतरावर आंबा-काजूची बाग आहे. या बागेला द्यावे लागणारे पाणी बागेमध्ये उपलब्धत नाही. परिसरामध्येही पाण्याची उपलब्धतता नसल्याने हे  दाम्पत्य घराकडूनच डोक्‍यावरून हंड्याद्वारे पाणी बागेमध्ये आणून झाडांना घालतात. गेल्या काही महिन्यांपासून  दाम्पत्याने बागेमध्ये विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या वयाचा आणि शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करता विहीर खोदणे शक्‍य होईल का, असा नकारात्मक विचारही त्यांच्या मनोमध्ये काहीकाळ डोकावला. मात्र, विहीर खोदण्याचा निश्‍चय आणि निर्धार केला. 

सुमारे साडेचार बाय साडेसहा फूट आकाराच्या विहिरीचे दररोज खोदकाम सुरू होते. दहा दिवस अंगमेहनतीने काम केल्यानंतर या विहिरीला पाणी लागले अन्‌ या  दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. विहिरीमुळे पांचाळ दाम्पत्याची रोजची पायपीट थांबली असून या पाण्याद्वारे त्यांची बागही फुलणार आहे. वयाची साठी ओलांडलेल्या या  दाम्पत्याने तरुणांना लाजविणाऱ्या अशा केलेल्या आदर्शवत कामगिरीचे साऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratngairi News In Raipatan, an elderly couple kicked 15 feet deep well

टॅग्स