कचरा मुक्तीचा वेंगुर्ला पालिकेचा यशस्वी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

वेंगुर्ले - येथील पालिकेने गेल्या तीन वर्षांमध्ये डंपिंग ग्राऊंडचे अक्षरशः पर्यटन स्थळात रूपांतर केले आहे. प्लास्टिक कचरा प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. येथील मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अत्यंत कल्पकपणे राबविलेल्या या प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्याची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने अधिक जास्त विचार केला.

वेंगुर्ले - येथील पालिकेने गेल्या तीन वर्षांमध्ये डंपिंग ग्राऊंडचे अक्षरशः पर्यटन स्थळात रूपांतर केले आहे. प्लास्टिक कचरा प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. येथील मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अत्यंत कल्पकपणे राबविलेल्या या प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्याची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने अधिक जास्त विचार केला.

पालिकेकडून मुळात कचरा घेतानाच २७ प्रकारांमध्ये वर्गवारी केली जाते. यात प्लास्टिकची चप्पल, बाटल्या, पिशव्या, डायपर्स अशा विविध घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अर्धे काम कमी होते. 

प्लास्टिकचे संकट कमी करण्यात आम्हाला खूप मोठे यश मिळाले आहे. आमचा हा प्रकल्प युनिक आहे. शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्‍य झाले. भविष्यात कचरा साक्षरता अभियान राबविले जाणार आहे. मुळातच नागरिक कचऱ्याविषयी सजग असले तर प्लास्टिकचे संकट दूर करणे खूप सोपे आहे. वेंगुर्लेवासीयांनी हेच सिद्ध केले आहे.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, वेंगुर्ले पालिका.

डंपिंग ग्राऊंडमध्ये हा कचरा आल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी ओतला जातो. यात पुन्हा अंतिम वर्गवारी केली जाते. प्लास्टिकच्या पिशव्या व पातळ प्लास्टिक तेथेच क्रश केले जाते. याची ४ रुपये किलो दराने विक्री होते. प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकलींगसाठी दिल्या जातात. त्यातूनही पैसे वसूल होतात. पालिकेने गेल्यावर्षी शहरातील काही रस्त्यांच्या डांबरीकरणातही प्लास्टिकचा वापर केला. तो यशस्वीही झाला. या डंपिंग ग्राऊंडवर गेल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लावलेली फुलझाडे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मितीही चालते. यातील प्लास्टिक पूर्णतः बाजूला केले असल्याने या खताचा दर्जा अधिक चांगला असतो.

पालिकेने या प्लास्टिकच्या कचऱ्याला असणारे ग्राहक कष्टपूर्वक शोधले आहेत. त्यामुळे वर्गवारी केलेला हा प्लास्टिकचा कचरा पालिकेसाठी उत्पन्नाचे साधन बनला आहे. ते काही ग्रामपंचायतींचा कचरासुद्धा स्वीकारतात. अट फक्त कचरा वर्गीकरणाची असते. या प्रकल्पामुळे वेंगुर्लेवासीयांनाही कचऱ्याच्या वर्गवारीचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे तिथल्या कुठल्याही घरात गेल्यास स्वच्छतेबरोबरच कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यातही बाजूला केलेले प्लास्टिक आवर्जून दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News waste disposal successful project in Vengurla