गाई-म्हशींवर उपचारांचा तीस वर्षांचा वसा...

सागर पाखरे
शनिवार, 29 एप्रिल 2017

आमच्याकडे एका गाईला पिंड आडवा असल्याने विणीमध्ये अडचण येवून ती वेदनांनी मरणासन्न झाली होती. शिवाय मध्यरात्रीची वेळ असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. मात्र मोहन सावंत यांनी तत्काळ येवून तिची व्यवस्थित सोडवणूक केली. तीही मोफत. त्यांचे हे कार्य देवदूताप्रमाणेच आहे. 
- प्रभाकर राऊत, दुध उत्पादक शेतकरी, पाली 

पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. म्हणून हातावर हात ठेवून सरकारी यंत्रणेला दोष न देता गेली 30 वर्षे गुरांवर उपचार करणाऱ्या मोहन गोविंद सावंत यांना शेतकरी डॉक्‍टरपेक्षाही अधिक मान देतात. पालीतील सावंत जनावरांवरील उपचारासाठी 24 तास उपलब्ध असतात. 

याबाबत त्यांच्याशी बोलताना सावंत यांनी सांगितले, की वडिलोपार्जित दुग्धोत्पादन व शेतीचा व्यवसाय. यामुळे दहावीपर्यंतचे शिक्षणानंतर शासकीय मनोरुग्णालयात नोकरी मिळाली. परंतु घरातील जनावरांची व शेतीची कामे यांच्या ओढीने नोकरी सोडून पुन्हा गोठ्याकडे वळले.

वडील असताना 1985 साली घडलेल्या प्रसंगाने त्यांचा आत्मविश्‍वास जागा झाला. गोठ्यातील एका गाईला विणीच्या वेदना सकाळी उशीरा सुरु झाल्या. दिवसभरानंतर रात्री वेदनांनी ती अस्वस्थ झाली. गाईच्या तोंडातून फेसही येऊ लागला. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क झाला नाही. गाईची अस्वस्थता पाहून वडिलांनी त्यांना गाईच्या गर्भाशयामध्ये पिंड फिरल्याने वासरू गर्भाशय मुखातून बाहेर येत नाही असे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्या वासराला गर्भाशयामध्ये हाताने फिरवून अत्यंत सुरक्षितपणे त्या गाईला व वासराला वाचविले. वडिलांनी आत्मविश्‍वास दिला होता. आणखी एका प्रसंगी म्हशीच्या आजारपणात वैद्यकीय मदत न मिळाल्याने स्वत: तिला ठराविक पद्धतीने उतार देवून गर्भाशय पिशवी निर्जंतूक करून ती आत पोटात घालून तिचा जीव वाचविला. 

श्री. सावंत जनावरांना पाय लाग, पोटफुगी, हगवण, तोंडातून फेस येणे, पाय आखडणे, पायात किवण होणे, जनावरांचा पिंड फिरलेला असल्यास तो फिरवून सोडवणूक करणे, अंग बाहेर आल्यास बसविणे अशा व्याधीवरही इलाज करतात. तसेच ते गंभीर आजारांवर औषधांद्वारे म्हणजे ओवा, आले, काळेमिरी, बैल कोळजन, राजबिंदू, नाटकनारी, सापदनी यासारख्या आयुर्वेदिक, झाडपाल्यांनी पशुवैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्राथमिक उपचार करतात. त्यामुळे जनावर वाचते, असे या भागातील शेतकरी आवर्जून सांगतात.

तसेच पाळीव गाई, म्हैस यांची आचळांवरून ते गाभण आहेत की नाही हे अचूकपणे सांगतात ही त्यांची खासीयत आहे. आतापर्यंत जवळपास 2000 जनावरांच्या सुखरूप विणी केल्या आहेत तर 1000 जनावरांवर प्राथमिक उपचार केले आहेत. 

मोहन सावंत हे शेतकरी जनावरांच्या विणीच्या वेळी कठीण परिस्थिती असेल तर स्वत:हून मदतीसाठी येतात. व आम्हाला मोठी प्रथमोपचारावेळी मदत करतात. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. 
- डॉ. रवींद्र केसकरकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This veterinary doctor in Pali is available 24 by 7