सौरऊर्जेमुळे सॊसायटीत लखलखाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

दहा किलो वॉटच्या प्रकल्पाद्वारे दिवसाला 55 युनिट विजेची निर्मिती होते. या प्रकल्पामुळे वर्षाला दोन लाख रुपयांची बचत होणार असल्याने वर्षांच्या एकूण खर्चामध्ये सोसायटीची 13 टक्के बचत झाली आहे. ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम बसविल्याने दिवसाला तयार झालेल्या विजेच्या युनिटची माहिती सोसायटीच्या सदस्यांना एसएमएसद्वारे मिळते.
- निशिथ शेकदार

पुणे - दीडशे सदनिकांची गृहसोसायटी. या सोसायटीचा विजेचा दरवर्षाचा खर्च पंधरा ते सोळा लाख रुपये. हा खर्च परवडतही नव्हता. पर्यायाने सोसायटीच्या सदस्यांनीच त्यावर तोडगा काढण्याचे ठरविले आणि सर्वसाधारण सभा घेऊन सुमारे दहा किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्पही बसविला. मागील वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यापासूनच येथील रहिवासी प्रकल्पाव्दारे निर्माण होणारी सौरऊर्जा सोसायटीतील सार्वजनिक उपयोगाकरीता आणत असून, विजेची बचत होत असल्याचे आवर्जुन सांगत आहेत. 

घोरपडी गावात एम्प्रेस गार्डनच्या मागे सर्व्हे क्र. 61 येथे अमर ऍम्बियन्स सहकारी गृहरचना संस्था आहे. सोसायटीत सात इमारती असून, एकूण दीडशे सदनिका आहेत. क्‍लब हाऊस, जलतरण तलाव, तीन बोअरवेल्सही आहेत. प्रत्येक इमारत अकरा मजली आहे. एका इमारतीमध्ये बावीस सदनिका (प्लॅट्‌स) आहेत. लिफ्टचीही सोय आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पही बसविला आहे.
 

शहराची विजेची मागणी आणि त्यानुसार होणारा पुरवठा लक्षात घेऊन सोसायटी सदस्यांनी पर्यावरण पूरक सौरऊर्जाचे प्रकल्प बसविण्याचे ठरविले. सोसायटीचे अध्यक्ष हिरू सुरतानी, प्रदीप गुरनानी, निशिथ शेकदार,ज्योती श्रीवास्तव, के. सी. बोथरा या पाच जणांची सोलर कमिटीही स्थापन केली. सोसायटीच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा सौरऊर्जा प्रकल्प (सोलर प्लॉण्ट) ऑक्‍टोबर 2015 मध्ये बसविला.
 

प्रायोगिक तत्त्वावर सध्या एका इमारतीवर सौरऊर्जेचे उपकरण बसविले आहे. भविष्यात अन्य इमारतींवरही असे उपकरण बसविण्याचा मानस सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पाला नेट मीटरिंग बसविण्याकरिता महावितरणकडे अर्ज केला आहे. त्यांनी वेळीच दखल घेतली तर आम्हाला नेट मीटरिंगची सुविधा बसविता येईल, असे निशिथ शेकदार यांनी सांगितले.

Web Title: solar power sociaty Flash