सिटी क्‍लबकडून महिन्याला ३५०० युनिट वीजनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - शहरातील सर्वांत जुना असलेला सिटी क्‍लब आज स्वतःची वीजनिर्मिती करू लागला आहे. साडेतीन हजार युनिट वीजनिर्मिती करून त्यातील सुमारे ७०० युनिट वीज ही ‘एमएसईडीसीएल’ला दिली जात असल्याची माहिती सिटी क्‍लबचे पदाधिकारी ॲड. गोपाळ पांडे यांनी दिली. 

औरंगाबाद - शहरातील सर्वांत जुना असलेला सिटी क्‍लब आज स्वतःची वीजनिर्मिती करू लागला आहे. साडेतीन हजार युनिट वीजनिर्मिती करून त्यातील सुमारे ७०० युनिट वीज ही ‘एमएसईडीसीएल’ला दिली जात असल्याची माहिती सिटी क्‍लबचे पदाधिकारी ॲड. गोपाळ पांडे यांनी दिली. 

शहरातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सिटी क्‍लबने निसर्गाची हानी रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आपल्या क्‍लबसाठीची वीज स्वतःच निर्माण करण्याची क्षमता उभी केली आहे. छतावर सोलर पॅनेल टाकून महिन्याकाठी सुमारे ३५०० युनिट वीज तयार करण्यात येत आहे. क्‍लबच्या सर्व गरजा पाहता २८०० युनिट वीज वापरली जाते. त्यामुळे महिन्याला सुमारे ७०० युनिट वीज ही एमएसईडीसीएलला दिली जात आहे. हे युनिट सिटी क्‍लबच्या खर्चात क्रेडिट केले जातात आणि उत्पादनापेक्षा जास्त वीज वापरली गेली, तर त्याचा भार क्रेडिट केलेल्या युनिटमधून वगळला जातो. त्यामुळे आता सिटी क्‍लबला वीज मोफत मिळत असल्याची माहिती ॲड. पांडे यांनी दिली. यासाठी १५ लाखांचा खर्च आला असून, ४.५७ लाखांची सबसिडी मिळाली असल्याचे ते पुढे म्हणाले. 

व्यायामशाळा, जिम्नॅस्टिक केंद्र सुरू  
सिटी क्‍लबच्या मागील बाजूला असलेल्या जागेत सुमारे एक हजार चौरस फुटाचा हॉल बांधून त्यात आधुनिक व्यायामशाळा तयार करण्यात आली आहे. यात आधुनिक उपकरणे आहेत. आउटडोअर जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, आगामी काळात जिम्नॅशियम हॉलही यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ॲड. गोपाळ पांडे म्हणाले.

बाहेरील क्‍लबशी करार करणार  
औरंगाबादेतील जुना क्‍लब म्हणून परिचित असलेल्या सिटी क्‍लबच्या सदस्यांना बाहेर गेल्यावर तिथल्या क्‍लबमध्ये खेळण्यासाठी संधी मिळावी, यासाठी बाहेरील क्‍लबशी करार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यासाठी औरंगाबादेत येणाऱ्या अन्य क्‍लब सदस्यांसाठी दोन चांगले सूट तयार करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पांडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news city club electricity