वारकरी भक्तिभावात गंगापूरच्या दिंडीरथांचा तोरा!

बाळासाहेब लोणे
सोमवार, 13 मार्च 2017

शिक्षण कितीही झालेले असले तरी कल्पकतेला चालना दिली की मनात बाळगलेले स्वप्न आकार घेऊ शकते, हे केवळ आयटीआय झालेल्या कारागिराने दाखवून दिले आहे. वारकऱ्यांना लागणारे दिंडीरथ साकारण्याचा विचार त्यांनी मनावर घेतला आणि त्याला मूर्त रूप दिले.

गंगापूर - शिक्षण कितीही झालेले असले तरी कल्पकतेला चालना दिली की मनात बाळगलेले स्वप्न आकार घेऊ शकते, हे केवळ आयटीआय झालेल्या कारागिराने दाखवून दिले आहे. वारकऱ्यांना लागणारे दिंडीरथ साकारण्याचा विचार त्यांनी मनावर घेतला आणि त्याला मूर्त रूप दिले. आजपर्यंत त्यांनी पाचशेवर दिंडीरथ साकारले असून राज्यासह राज्याबाहेर भक्तिभावात रमून जात आहेत. त्यातून त्यांनी रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासह चार मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्णात्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे.

येथील धनराज लक्ष्मण सोमवंशी यांची ही कथा. दुष्काळामुळे सरलाबेट (ता. वैजापूर) हे मूळगाव सोडून 35 वर्षांपूर्वी सोमवंशी कुटुंब येथे स्थायिक झाले. घरची स्थिती हालाखीची, शेती करावी तर जमिनीचा तुकडाही नाही, उच्च शिक्षणासाठी पैसा नाही. अशा स्थितीत वडील लक्ष्मण सोमवंशी यांच्या पारंपरिक सुतार कामात मदत करायची आणि शालेय शिक्षण घ्यायचे, अशी धनराज यांची दैनंदिनी बनली. या दरम्यान वेगवेगळ्या कल्पना लढवून ते लाकडापासून खेळणी तयार करू लागले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर 1989 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) त्यांना मोफत प्रवेश मिळाला. दोन वर्षांचा "पॅटर्न मेकर' अभ्यासक्रम पूर्ण झाला. पुढे अभियंता व्हायचेच, अशी त्यांची जिद्द होती; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे नमते घेतले आणि अभियंता होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. झालेल्या शिक्षणाला कल्पकतेचे कोंदण देऊन त्यांनी फेब्रिकेशनचे दुकान सुरू केले. पारंपरिक सुतार कामाला फाटा देत वारकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी दिंडीरथ साकारायला सुरवात केली. लोखंड आणि अन्य साहित्य वापरून महिनाभरात कलाकुसरीने एक रथ तयार केला जातो. एका रथाला एक लाख रुपये खर्च येतो. त्यातून 25 टक्के नफा मिळतो. मदतीला त्यांनी दोन कारागीर घेतले आहेत. आतापर्यंत त्यांनी पाचशेवर दिंडीरथ तयार केले आहेत. ते ठिकठिकाणांहून निघणाऱ्या दिंड्यांतील भक्तिभावात रममाण होत आहेत. कुकुरमुंडा (गुजरात), देवगड, आळंदी, ज्ञानेश्‍वर मंदिर (नेवासा), मिरजगाव, ओतूर, शिखरापूर, जळगाव आदी ठिकाणांहून आलेली मागणी त्यांनी पूर्ण केली आहे. मागणीत दरवर्षी वाढच होत आहे. एक रथ बनवायला एक लाख रुपये खर्च येतो. यात 25 टक्के नफा मिळतो. मंदिराचे कळस, डीजे रथ, स्वर्गरथ आदीही ते साकारत आहेत.

दरम्यानच्या काळात ते संसारात गुंतले. आपल्यासारखी फरपट होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या चार मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला. थाटलेल्या दुकानाचा हळूहळू जम बसू लागला. आर्थिक परिस्थिती बळकट होऊ लागली. त्यातून त्यांनी चारही मुलांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली.
मुलगा रोहिदास मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत आहे. दूरचित्रवाणीवर नुकत्याच झालेल्या एका लोककलेच्या कार्यक्रमात तो झळकला. मुलगी रोहिणी मुंबईतील महिला विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिही दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीवरील "असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकेत झळकली आहे. रेणुकाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून लहान मुलगी नलिनी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिच्यारूपी धनराज हे आपले अभियंता होण्याचे स्वप्न साकारत आहेत.

दुष्काळामुळे गाव सोडावे लागले. अभियंता व्हायचे होते; पण परिस्थिती नव्हती. वेगवेगळ्या कल्पना सूचल्या की त्यावर लगेचच काम करीत राहायचे ठरवले. त्यातून साकारलेल्या कलाकृतींतून उत्पन्न मिळू लागले. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये आतापर्यंत पाचशे दिंडीरथ दिले आहेत. अजूनही वेगळे प्रयोग सुरूच आहेत. मुलांनाही उच्च शिक्षण दिले आहे.
- धनराज सोमवंशी, कारागीर

Web Title: Positive story of Gangapurs Dhanraj Somwanshi