वृक्षारोपण करून नववधू बोहल्यावर

सुनील शेडगे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

विवाहाचा सोहळा संस्मरणीय ठरावा अन्‌ वृक्षलागवडीला, पर्यावरणाला गती लाभावी, हा या आगळ्या उपक्रमामागील हेतू असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

नागठाणे (जि. सातारा)  : विवाहाच्या सुंदर क्षणांत अर्थपूर्णता भरताना बोरगाव (ता. सातारा) येथे आज आगळा उपक्रम राबविण्यात आला. त्यात नववधूच्या हस्ते विवाहापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
बोरगाव येथील मोनिका दत्तात्रय साळुंखे हिचा नुकताच विवाह झाला. मोनिका ही गावातील धनाजी जाधवराव प्रतिष्ठानची अध्यक्षा आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती विविध सामाजिक उपक्रमांत कार्यरत असते. विवाहाचे औचित्य साधताना तिने स्वतःच्या हस्ते वृक्षारोपण केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढाणे तसेच सरसेनापती धनाजी जाधवराव प्रतिष्ठानचे अमरसिंह जाधवराव, उमेश वाघ, मयूरी साळुंखे, डॉ. विनायक साळुंखे, गजानन साळुंखे, निखिल साळुंखे, राजेंद्र साळुंखे, सुमीत साळुंखे, अक्षय साळुंखे, ओंकार साळुंखे आदी उपस्थित होते.
 
विवाहाचा सोहळा संस्मरणीय ठरावा अन्‌ वृक्षलागवडीला, पर्यावरणाला गती लाभावी, हा या आगळ्या उपक्रमामागील हेतू असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दत्तात्रय ढाणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकारास आला. गावात ज्या वधूचा विवाह असेल, तिच्या हस्ते झाड लावून पुढील विवाहविधींना सुरवात केली तर त्यास वेगळे परिमाण लाभेल, वृक्षारोपण चळवळीला गती लाभेल, असे श्री. ढाणे यांनी सांगितले.

अवश्य वाचा -  #MondayMotivation एकीचे बळ

ही झाडे गावातील मुख्य रस्ता, सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी परिसरात लावण्यात येत आहेत. श्री. ढाणे स्वतः जातीने या झाडांची निगा राखत असतात. 

मुलींसाठी ठेव योजना 

केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर अन्य उपक्रमांच्या दृष्टीनेही श्री. ढाणे यांचा हातभार लागताना दिसतो. विशेषतः गावात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावर ते ठराविक रक्कम बॅंकेत ठेव म्हणून ठेवतात. गणेशोत्सव काळात मुलींचे शिक्षण, पर्यावरण याबाबत प्रबोधन करतात.

सातारा सातारा सातारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Accelerate The Tree Plantation Movement Bride Planted Tress