मरावे परी अवयवरूपी उरावे!

- सुधाकर काशीद
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कमलताई कांबळे यांचे अवयवदान - जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया

कमलताई कांबळे यांचे अवयवदान - जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया

कोल्हापूर - ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ याऐवजी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देत श्रीमती कमल तुकाराम कांबळे (वय ६५) यांनी मंगळवारी (ता. ११) जगाचा निरोप घेतला. काही दिवस आजाराशी झुंजणाऱ्या कमलताई ब्रेन डेड (मेंदूची मृतावस्था) अवस्थेत गेल्या. या अवस्थेतून त्या पुन्हा बऱ्या होण्याची शक्‍यताच नव्हती. म्हटलं तर जिवंत; पण वास्तवात मृत (मेंदू) असलेल्या कमलताईंच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि काल  (ता. ११) त्यांची किडनी, यकृत व डोळे काढले आणि आज पुण्यात संबंधित अन्य रुग्णांना ते बसविले. काल सर्वत्र दसऱ्याच्या खरेदीची, नव्या संकल्पाची, शुभेच्छांची लगबग सुरू होती; पण ‘ॲस्टर आधार’मध्ये कमलताईंचे अवयव काढण्याची, त्याला केसाचाही धक्का न लागता पुण्यास पाठवण्याची एक निःशब्द लगबग सुरू होती. रात्री दीड वाजता ही लगबग थांबली. हे अवयव घेऊन व्हॅन पुण्याकडे रवाना झाली आणि अवयवदान  संकल्पनेच्या प्रत्यक्ष कृतीची कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली नोंद झाली.

कमल कांबळे (मूळ गाव सरूड ता. शाहूवाडी) यांच्या अवयवदानामुळे व त्यासंबंधी ॲस्टर आधार व केईएम हॉस्पिटल (पुणे) यांच्या टीमने केलेल्या प्रयत्नामुळे गरजू रुग्णांत आशेची नवी पहाट उजाडली. काही दिवस अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाची चर्चा सुरू आहे. देशात अशा शस्त्रक्रिया मोठ्या  शहरांत होत आहेत. कोल्हापुरात कमलताई कांबळे यांच्या परिवाराने पुढाकार घेत प्रगत शस्त्रक्रियेच्या या साखळीत कोल्हापूरला नेऊन जोडले.

काही दिवस कमलताई आजारी होत्या. त्यांचे चिरंजीव ॲस्टर आधारमध्येच रेडिओलॉजिस्ट आहेत. उपचार सुरू असताना कमलताई बेशुद्धावस्थेत गेल्या. त्यांच्यावर उपचारासाठी काही चाचण्या केल्या असता, त्या जिवंत असल्या तरीही त्यांचा मेंदू मृतावस्थेत (ब्रेन डेड) असल्याचे निदान झाले. या अवस्थेतून रुग्ण पुन्हा बरा होणे शक्‍यच नसते. मात्र या अवस्थेत अशा रुग्णाचे हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, डोळे किंवा शरीराचे अन्य भाग सुस्थितीत असतात. जर ते भाग काढून दुसऱ्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली तर त्या रुग्णाला नवे जीवन मिळवून देऊ शकतात. आईची ही स्थिती पाहून डॉ. संतोष कांबळे-सरूडकर, त्यांचे भाऊ रणजित व बहीण तेजस्विनी यांनी आईचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आई वरवर जिवंत असली तरी तिचा मेंदू मृत झाल्यामुळे ती पुन्हा बरी होणार नाही. पण तिचे काही अवयव आताच काढले व दुसऱ्या रुग्णांना बसवले तर ते रुग्ण नवे जीवन जगू शकतील, म्हणून त्यांनी पुढील हालचाली सुरू केल्या. ‘ॲस्टर आधार’ने यात पुढाकार घेतला. केईएम हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण कक्षाशी संपर्क साधला. काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केईएमच्या डॉक्‍टरांचे पथक मंगळवारी रात्री ॲस्टर आधारमध्ये आले.

पुढच्या प्रक्रियेत निष्णात डॉक्‍टर, भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरली. साधारण किडनी काढल्यानंतर १२ ते १६ तासांत,  यकृत सहा ते दहा तासांत, डोळे २४ तासांत दुसऱ्या शरीरात बसवायचे असतात. त्यामुळे दसऱ्याची अख्खी रात्र ॲस्टरच्या सर्व स्टाफने रुग्णांच्या जीवनात नवा ‘सोनेरी क्षण’ आणण्यासाठी एकवटली.

कोल्हापुरातून हे अवयव घेऊन केईएमची टीम पहाटे पुण्यात पोचली. तेथे आधीच तयार ठेवलेल्या रुग्णांवर सकाळी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. या रुग्णांच्या नव्या आयुष्याची सुरवात झाली आणि त्याचवेळी इकडे सरूडमध्ये पार्थिवास अग्नी देताना कांबळे कुटुंबीयांच्या एका डोळ्यात कमलताई गेल्याचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात तिच्या अवयवांमुळे कोणाला तरी नवे आयुष्य मिळाल्याचे समाधान तरळत राहिले.

‘त्याला’ भावनिक किनार
अवयवदान व अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्यासाठी लगेच निर्णयाची आवश्‍यकता असते. त्यासाठी ब्रेन डेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या संमतीची आवश्‍यकता असते. ब्रेन डेड झालेला रुग्ण पुन्हा बरा होत नाही व तो लवकर अखेरचा श्‍वासही घेत नाही. पण ही अवस्था नातेवाईक मान्य करत नाहीत. अर्थात त्याला भावनिक किनार असते.

Web Title: body part donate in kolhapur

टॅग्स