शिक्षणाची आस असणाऱ्या मुलीला कोल्हापूर बालसंकुलाची सावली

शिक्षणाची आस असणाऱ्या मुलीला कोल्हापूर बालसंकुलाची सावली

कोल्हापूर - रस्त्याकडेला सडलेली रिक्षा म्हणजे तिचं घर. वडिलांनी मजुरी करून आणलं, तर तिच्या पोटात दोन घास जायचे. इतर मुलींप्रमाणे शिकण्याच्या इच्छेने ती दररोज जवळच्या शाळेत जायची. परिसरातील बॅंकेच्या एटीएमचा उजेड म्हणजे तिच्या अभ्यासाचं ठिकाण; पण नको त्या व्यवसायाचा तो परिसर होता. अशा वातावरणातही स्वतःला सिद्ध करण्याचा त्या शाळकरी मुलीचा प्रयत्न सुरू होता. 

सामाजिकतेचे भान असलेल्या एका तरुणाच्या ती दृष्टीस पडली. त्याने बॅंकिंग क्षेत्रातील दोघा मित्रांच्या मदतीने चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्यातून तिला बालसंकुलात दाखल करून तिच्या शैक्षणिक भविष्याला दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.मध्यवर्ती बस स्थानकाचा परिसर म्हणजे दिवसभर गजबजलेला असतो; पण रात्रीच्या वेळी ठराविक भाग वगळता इतरत्र मात्र शांतता असते. त्याच भागात रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार सुरू असतात. अशाच भागात एक कुटुंब रस्त्याकडेला सडलेल्या अवस्थेत असलेल्या रिक्षात राहते.

रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या मुलांबाबतची माहिती नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या १०९८ वर द्यावी. त्यातून अशी मुले संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात येतील. त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. इतरांनीही त्याचे अनुकरण करावे. 
- संग्राम पाटील

त्यात कुटुंबातील चिंकी (नाव बदललेले आहे) १३ वर्षांची शाळकरी मुलगी, वडील व नातेवाइकांसोबत राहते. वडील रस्त्यावर मिळेल, ते मजुरीचे काम करतात. दिवसभर मजुरी शोधायची, रात्री पैसे मिळाले तर काहीतरी खायला घेऊन जायचे असा त्यांचा दिनक्रम आहे. मजुरीला गेल्यावर चिंकीला दिवसभर सांभाळणार कोण, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. उपाय म्हणून त्यांनी तिला जवळच्या शाळेत घातले. शाळेत चिंकीला शिक्षणाची गोडी लागली. शालेय पोषणामुळे तिच्या सकाळच्या जेवणाचा प्रश्‍नही सुटत होता. एक-एक इयत्ता करत ती सातवीच्या वर्गापर्यंत गेली.

मजुरीसाठी वडील व नातेवाईक सकाळी बाहेर पडले, की रात्रीपर्यंत रिक्षाकडे कोणी फिरकत नसायचं. दिवसभर शाळेत, सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यामुळे चिंकीचा वेळ सहज जायचा. रात्री घरी कोणी खायला घेऊन आलं, की ती दोन घास खाऊन थेट शेजारील बॅंकेच्या एटीएमजवळ जायची. त्या एटीएमच्या प्रकाशात बाजूला रात्री उशिरापर्यंत शाळेचा अभ्यास करायची. अनेकांच्या नजरेस ती पडायची. याच परिसरात कॅपिटल फस्ट नावाच्या फायनान्स कंपनीत मयूर जाधव हे काम करतात. एक दिवस रात्री एटीएमच्या दारात चिंकी अभ्यास करताना नजरेस पडली. त्यांनी याची माहिती राजारामपुरीतील इक्विटास्‌ बॅंकेत काम करणाऱ्या संग्राम पाटील व सुशांत चंदनशिवे या दोघा मित्रांना दिली. तसे त्या दोघांनी चिंकीची सविस्तर माहिती घेतली.

त्यानंतर चाईल्ड हेल्प लाइनच्या १०९८ वर संपर्क केला. तातडीने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. तिच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना बाल संकुलात नेले. समितीने त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर तिला बाल संकुलात दाखल केले. आज संकुलातील शैक्षणिक वातावरणात ती रमून गेली आहे. 

समाजातील अशा अनेक मुलांचे आयुष्य रस्त्यावरच आहे; पण त्याकडे कळत नकळत डोळेझाक होते. त्यामुळे गुणवत्ता असूनही, अभ्यास करण्याची क्षमता असूनही कोणाचेही सहकार्य न मिळाल्यामुळे उज्ज्वल भविष्य घडू शकत नाही; पण अशांकडे संग्राम पाटील, सुशांत चंदनशिवे आणि मयूर जाधव यांच्यासारख्या जागरूक नागरिकांनी लक्ष दिले. चिंकीला हवी असणारी मदत मिळवून दिली. अशी जागरुकता इतरत्रही निर्माण झाल्यास, अनेक चिंकींचे रस्त्याकडेवरील आयुष्य उज्ज्वल घडण्यास मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com