esakal | गोष्ट एका लग्नाची.. तांदळाऐवजी बीजाक्षतांची... 
sakal

बोलून बातमी शोधा

गोष्ट एका लग्नाची.. तांदळाऐवजी बीजाक्षतांची... 

यजमानांनी अक्षताऐवजी चक्क भेंडी, पालक, पावटा, मुळा व कोथिंबीर या भाज्यांच्या बियांची पाच सुंदर पाकिटे उपस्थितांना दिली व साध्या कुंडीत या बिया रुजवून दीड महिन्याने रोज घरच्या घरी ताज्या भाज्या खायला मिळतील, अशी संधी घेण्याची विनंती केली. 

गोष्ट एका लग्नाची.. तांदळाऐवजी बीजाक्षतांची... 

sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर - लग्न सोहळ्यात अक्षता टाकून तांदळाची नासाडी थांबण्याचे जरूर प्रयत्न चालू आहेत. कुठे प्रतिसाद मिळतो, कुठे नाही अशी परिस्थिती आहे. तांदळाची नासाडी थांबवणे गरजेचे आहे. पण काही जण सोनेरी थैलीतून भारीतला तांदूळ अक्षता म्हणून देतात. या उलटसुलट पार्श्‍वभूमीवर आज मात्र एका विवाह समारंभात निमंत्रितांना सुखद धक्का मिळाला.

यजमानांनी अक्षताऐवजी चक्क भेंडी, पालक, पावटा, मुळा व कोथिंबीर या भाज्यांच्या बियांची पाच सुंदर पाकिटे उपस्थितांना दिली व साध्या कुंडीत या बिया रुजवून दीड महिन्याने रोज घरच्या घरी ताज्या भाज्या खायला मिळतील, अशी संधी घेण्याची विनंती केली. 

रवींद्र अष्टेकर या कृषी अधिकाऱ्यांनी आज त्यांचा मुलगा निरंजन व चि. सौ. कां. ऋचा यांच्या लग्नात हा अभिनव उपक्रम राबवला. लग्नात अक्षताच्या निमित्ताने तांदळाचा वापर श्री. अष्टेकर यांनी सतत खटकत होता. अक्षताऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर काही ठिकाणी सुरू होता. पण अक्षताच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव आणि त्याच पाकळ्या पायदळी तुडवल्या जाणेही त्यांना खटकत होते. मग त्यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात अक्षता, फुलाच्या पाकळ्या याला एक पर्याय निवडला. त्यांनी चांगला वाण असलेल्या भेंडी, मुळा, कोथिंबीर, पालक व पावट्याच्या बिया आणल्या. अक्षताऐवजी या बियांची सुंदर छोटी पाकिटे निमंत्रितांना दिली. ही आगळी-वेगळी भेट निमंत्रितांना सुखद धक्का देणारी होती. या बियांसोबत त्यांना छोटे पत्रकही दिले. आणि अक्षताऐवजी या बीजाक्षता कुंडीत रुजवून या लग्नाची आठवण म्हणून रोज ताज्या भाज्या मिळवण्याचे आवाहन केले. 

मुळा, पालक, पावटा, कोथिंबीर व भेंडीची भाजी मोठ्या कुंडीत सहज येते. रोज एक ग्लास पाणी घातले की, रोप आपोआप खुलू लागेल आणि अंगणात, अंगण नसेल तर टेरेसवर, टेरेस नसेल तर बाल्कनीतही ते डोलू शकेल. 
- रवी अष्टेकर 

इतरांनाही आदर्श 
या संदर्भात श्री. अष्टेकर म्हणाले, ""रंगवलेल्या तांदळाच्या अक्षतांना चिमण्या, कावळेही चोच लावत नाहीत. जनावरेही तोंड लावत नाहीत. त्यामुळे सर्व तांदूळ वाया जातो. त्यामुळे मी मुलाच्या विवाहात बीजाष्टकाची संकल्पना आखली. अक्षतांऐवजी दिलेल्या या बिया थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीत रुजवल्या तर दीड महिन्यात त्या फुलतील. खाण्यासाठी उपयोगी येतील. पाच बियापैकी रोज एक वेगळी ताजी भाजी आपल्याला खुडता येईल. यामुळे तांदळाची नासाडी थांबेल आणि माझ्या मुलाच्या विवाहाची स्मृतीही जपली जाईल. पर्यावरणाची जाणीव सर्वांना होईल आणि इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल.'' 

loading image
go to top