मावळे जलस्वराज्याचे...!, वृत्तपत्र विक्रेत्यांची अनोखी चावी बंद मोहीम

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

  • छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक. स्वराज्यात त्यांनी जलसंधारण, जलसंवर्धनासह पर्यावरणीय सर्वच प्रश्‍नांवर ठोस उपाययोजना केल्या. पाण्याच्या वापराबाबतही त्यांनी आज्ञापत्रे काढली. आजही ही आज्ञापत्रे मार्गदर्शक ठरतात आणि सर्वच घटकांना दिशा देतात. शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनाही जणू त्यातूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पहाटे घरोघरी वृत्तपत्रे पोचवताना त्या त्या परिसरात पाण्याच्या वापराबाबत प्रबोधन सुरू केले. शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांची ही चावी बंद मोहीम साऱ्यांसाठीच दिशादर्शक ठरणार आहे.

काय आहे मोहीम?
शहरातील बहुतांश भागात रात्री अडीच-तीननंतर नळाला पाणी येते आणि वृत्तपत्र विक्रेते पहाटे चारच्या सुमारास वृत्तपत्रे पोचवण्यासाठी शहरातील विविध भागांत बाहेर पडतात. त्यावेळी परिसरातून फिरत असताना जेवढे नळ चालू आहेत, त्यांच्या चाव्या बंद करत ते पुढे जातात. त्याच्याही पुढे जाऊन दिवसभरात अनेकांना चावी बंद करण्याचे आवाहन करतात. काहींना तर चाव्या स्वतः आणून देतो, म्हणून सांगतात आणि शक्‍य तितके पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतात. कारण नदीतून उपसा करण्यापासून ते थेट घरापर्यंत पाणी येईपर्यंतचा खर्च मोठा आणि त्याचा भार प्रत्येक शहरवासीयांना सोसावा लागतो, ही त्यांची त्या मागची प्रामाणिक भावना आहे. 

हे प्रातिनिधिक मावळे...
किरण व्हनगुत्ते यांनी ही मोहीम सुरू केली आणि नंतर सुनील समडोळीकर, सुनील चव्हाण, श्रीपती शियेकर, अंकुश परब यांनीही सक्रिय पुढाकार घेतला. श्री. व्हनगुत्ते शनिवार, जुना बुधवार, शिवाजी पेठेसह उत्तरेश्‍वर परिसरात वृत्तपत्रे पोचवण्याचे काम करतात तर श्री. समडोळीकर व श्री. चव्हाण मंगळवार पेठ, चिले कॉलनी परिसरात. श्री. शियेकर ताराबाई पार्क आणि श्री. परब कसबा बावडा, पोलिस लाईन या परिसरात. पाण्याच्या बचतीसाठी सक्रिय असलेल्या विविध घटकांपैकी हे काही प्रातिनिधिक मावळे. प्रत्येक जण रोज किमान दहा ते पंधरा नळ बंद करतात. त्याशिवाय पाण्याची टाकी वाहत असेल तर संबंधितांना तशा सूचना लगेच देतात. 

दृष्टिक्षेपात कोल्हापूर

  •  मिळकतींची संख्या ः एक लाख ३४ हजार
  • नळ कनेक्‍शन्स ः १ लाख १७ हजार २८
  • कूपनलिकांची संख्या ः ७२५
  • जलकुंभ ः ३०

 

Web Title: Kolhapur News Shivjayant Special Story