भिनली वेदना रोमारोमात, विचारीत जाब विवेकाला...!

संभाजी गंडमाळे
रविवार, 16 जुलै 2017

आश्रमात घरच्यांनी सोडून दिलेल्यांबरोबरच काही स्वतःहून येथे दाखल झालेले ज्येष्ठ आहेत. मात्र काहीही असले तरी आयुष्याच्या सायंकाळी त्यांना मायेची उब मिळायलाच हवी. 
- विवेकानंद कुंभार, विद्यार्थी

कोल्हापूर : ''नियती जितकी कठोर तितकेच का नरम पडत जाते काळीज? भिनते वेदना रोमारोमात विचारीत जाब विवेकाला...'' साऱ्यांचेच काळीज चिरून टाकणाऱ्या 'नटसम्राट' चित्रपटातील अनेक संवादांपैकी हा एक संवाद. समाजात वृद्धाश्रम वाढले. तेथे भौतिक सुविधा जरूर आहेत, पण ज्येष्ठांशी मनमोकळा संवाद साधायला कुणीच नाही. नेमकी हिच वेदना महावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याही रोमारोमात भिनली. स्वतःच्याच विवेकाला त्यांनी जाब विचारला आणि बाहुबली (ता. हातकणंगले) येथील आचार्य शांतिसागर वृद्धसेवा आश्रमातील तब्बल बेचाळीस ज्येष्ठांना दत्तक घेतले. 

'नटसम्राट' या चित्रपटामुळे वाढते वृद्धाश्रम आणि ज्येष्ठांच्या प्रश्‍नांबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण महावीर कॉलेजच्या पिछाडीस असलेल्या कर्नल गायकवाड यांच्या वाड्यात झाले. त्यामुळे महाविद्यालयाला या प्रश्‍नाशी कसे जोडून घेता येईल, असा विचार पुढे आला आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी तसा प्रस्ताव विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनीही लगेच प्रतिसाद दिला आणि बाहुबली येथील वृद्धसेवा आश्रमात महिन्यातून दोनदा जावून ज्येष्ठांबरोबर एक दिवस घालवायचा निर्धार झाला. महाविद्यालयापासून रेल्वेस्टेशन गाठायचे आणि तेथून रेल्वेने हातकणंगले आणि तेथून बाहुबली, असा हा प्रवास सुरू झाला. पुढे महिन्या-दोन महिन्यांनी काही विद्यार्थी गळलेही, पण पंचवीस विद्यार्थ्यांनी वर्षभर हा उपक्रम नेटाने सुरू ठेवला. यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि प्राचार्यानी पुन्हा नवीन विद्यार्थ्यांना आवाहन केले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागाची ग्वाही दिली. पुन्हा हा उपक्रम आता सुरू होणार आहे. 

आश्रमात सर्व भौतिक सुविधा आहेत. मनोरंजनपर उपक्रम होतात, पण या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तेथील ज्येष्ठांशी नात-नातवांप्रमाणे नाते जोडले आहे. ज्येष्ठ महिलांचे केस विंचरणे, पाय दाबून देणे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे, पत्र लिहून पाठवणे, मित्रांशी संपर्क घडवून आणणे, विविध पारंपरिक खेळ खेळणे, अनुभवांचे शेअरिंग करणे आदी गोष्टी हे विद्यार्थी करतात आणि 'कुणी घर देता का घर' हा प्रश्‍न मनातून काढून टाका, असे आवाहन ज्येष्ठांना करतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या जाणिवाही अधिक समृद्ध झाल्या असून घरातील ज्येष्ठांशी त्यांची नात्यांची वीण आणखीन घट्ट होत असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, समन्वयक प्रा. गोमटेश्‍वर पाटील सांगतात. 

समाजाशी नाळ 
महाविद्यालयांची नाळ समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली पाहिजे, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईल पुस्तक गॅलरी या उपक्रमातून जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या विद्यार्थी व विद्यार्थींनीनी पिंजून काढल्या आणि महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेटी बचाओ अभियानही अधिक व्यापक केले आहे. समाजातील ज्येष्ठांना आदर मिळावा. त्यांच्या आयुष्याची सायंकाळ अधिक सुखद व्हावी, यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले. 

संभाजी गंडमाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi website kolhapur news Sambhaji Gandmale