पोलिसांच्या तत्परतेने वृद्धास गवसले घर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

बोरगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली मदत व पोलिसांच्या तत्परतेमुळे थोरात यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवू शकलो, याचे विशेष समाधान वाटते. 
- चंद्रकांत माळी , सहायक पोलिस निरीक्षक, बोरगाव पोलिस ठाणे.

नागठाणे (जि. सातारा) : बोरगाव (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान अन्‌ पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका वृद्धास आज स्वतःचे घर गवसले. गावापासून शेकडो किलोमीटर अंतर दूर आलेल्या या वृद्धास अखेर आपल्या नातेवाईकांचे दर्शन घडले.
 
सकाळी 11 च्या सुमारास बोरगाव येथील सचिन राजेंद्र कामटे यांना पुणे- बंगळूर महामार्गालगत 75 वर्षांचे एक वृद्ध बेवारस स्थितीत आढळले. त्यांनी संबंधितांची विचारपूस केली. त्यावरून ते घरापासून दुरावल्याचे लक्षात आले. कामटे यांनी वृद्धास बोरगाव पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा संबंधिताचे रामचंद्र कचरू थोरात हे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

थोरात हे रोटेगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली. त्यांच्याकडून पोलिसांनी कुटुंबाची माहिती घेतली असता त्यांचे पुत्र रवींद्र हे कोल्हापूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचलनालयात चालक म्हणून नोकरीस असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने त्यांच्या पुत्राशी संपर्क साधला. 
या वेळी थोरात हे हरवले असल्याची नोंद करवीर (जि. कोल्हापूर) पोलिस ठाण्यात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

थोरात यांचे नातेवाईक बोरगाव येथे पोचेपर्यंत बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व महिला समितीच्या अध्यक्षा पद्मजा वीरेंद्र कळसकर व सचिन राजेंद्र कामटे, दत्तात्रय ढाणे यांनी त्यांची काळजी घेतली.

बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनीही याकामी विशेष परिश्रम घेतले. थोरात यांचे कुटुंबीय, नातेवाईकांनी पोलिस, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police helped the missing senior citizen in borgoan