देवराष्ट्रेतील गवंड्याच्या पोराची परदेशी भरारी

देवराष्ट्रेतील गवंड्याच्या पोराची परदेशी भरारी

देवराष्ट्रे - मनात जिद्द, परिश्रमाची तयारी असेल  तर संकटे रोखू शकत नाहीत. यश मिळतंच. कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रेतील एका सामान्य गवंड्याच्या मुलाने नायझेरियात शासकीय रुग्णालयातील पद मिळवून ते सिद्ध केले आहे. तो सातासमुद्रापार गेला आहे. येथील गणेश अशोक पवार याची यशकथा. परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात नायझेरियातील केल्साय हरीसन या शासकीय रुग्णालयात एम.आर. आय. टेक्‍नोलॉजीस्ट म्हणून त्याची निवड झाली आहे. छिन्नी, हातोड्याने दगड फोडण्याचा पारंपरिक व्यवसाय जागतिकीकरणाच्या रेट्यात मोडकळीस आला.

आर्थिक परिस्थिती ढासळळी. पण मुलाला उच्च शिक्षण द्यायचेच. त्याला परदेशात नोकरीसाठी पाठवायचेच या जिद्दी आई-वडील कष्ट करीत होते. आर्थिक स्थिती हलाखीची असली तरी मात करीत गणेशचे वडील गवंडीकामाकडे वळले. त्यातही असे, की आज आहे तर उद्या काम नाही. साराच बेभरवसा. घरच्या परिस्थितीची जाणीव व आई-वडिलांचे मुलाने परदेशी नोकरी मिळवावी हे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. १२ वी पर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालयात त्याने घेतले. डॉक्‍टर होण्याचे स्वप्न व आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशने एम.आय.आर टेक्‍नोलॉजीस्टचे शिक्षण कोल्हापूर येथे घेतले. सात महिन्यांत त्याने देवराष्ट्रे- कोल्हापूर रेल्वेने ये-जा केले.

शिक्षण घेताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागलाच. पण त्याने जिद्द सोडली नाही. शिक्षण घेताना एका हॉस्पिटलमध्ये काम मिळाले. काम रात्रपाळीचे असल्याने राहण्याचा प्रश्न मिटला. दिवसा कॉलेज व रात्री हॉस्पिटलमध्ये काम. असे करीत तो अभ्यास करीत होता. देवराष्ट्रे- कोल्हापूर ८० किलोमीटर ये-जा करावे लागे. अभ्यासास वेळ मिळत नसे.  राहण्याचा प्रश्‍न मिटला होता. काम मिळाल्याने अभ्यासालाही जागा मिळत होती. तिथे त्याने प्रथम  क्रमांक पटकावला. नंतर प्रशिक्षणासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात गेला. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर नोकरीच्या शोधात तिथेच मित्राच्या घरी राहिला.

एक दिवस नायझेरियात शासकीय रुग्णालयात 
एम. आर. आय. टेक्‍नोलॉजीस्टची जागा रिक्त आहे, अशी माहिती मित्रानेच त्याला दिली. त्याने ॲप्लीकेशन केले. काही दिवसांनी मुलाखत झाली. पहिल्याच प्रयत्नात तो पात्र ठरला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते त्याला लपवता आले नाहीत. तो गहिवरला. खडतर प्रवास पार केला होता. आता मागे पहायचे नाही, असे त्याने ठरवले. मनात जिद्द परिश्रमाची तयारी असली, की माणसाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही हे त्याने सिद्ध करून दाखवले.

ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करावा. ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात जाऊन अभ्यास केल्याने यश मागे धावत आले. प्रत्येकाकडे एक कला असते. ती दाखवण्याची हिंमत प्रत्येकाने दाखवावी. संकटेच काय परिस्थितीही मग आपल्या जिद्दीपुढे झुकते.
- गणेश पवार,
एमआरआय टेक्‍नोलॉजीस्ट,
(शासकीय रुग्णालय, नायझेरिया)

मुलगा मोठा अधिकारी व्हावा असे प्रत्येक आई-वडिलाचे स्वप्न असते. आर्थिक संकटावर मात करून गणेशने मिळवलेले यश शब्दात व्यक्त करू शकत नाही. प्रबळ इच्छाशक्तीने तो आज सातासमुद्रापार गेला. याचा आम्हाला अभिमान आहे.
- अशोक पवार, 

(गणेशचे वडील, देवराष्ट्रे, ता. कडेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com