खारुताईच्या गतीने "ती' चढते विजेच्या खांबावर ! 

खारुताईच्या गतीने "ती' चढते विजेच्या खांबावर ! 

मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी जावळी तालुक्‍यातील दापवडीची अक्षदा रांजणे ही युवती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वीज वितरण कंपनीच्या करहर शाखेत वीजतंत्री म्हणून काम करणाऱ्या अक्षदा हिचे धाडस हे महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हेच दाखवते. 

नोकरी म्हटलं की काही क्षेत्रांत पुरुष तर काही क्षेत्रांत महिलांच्या मक्तेदारीची चर्चा असते. विशेषतः कष्ट ज्या क्षेत्रात जास्त आहेत, त्या क्षेत्राकडे महिला वर्ग पाठ फिरवतो. मात्र, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो व काही जण एक आव्हान म्हणून जोखीम स्वीकारत "इस जमानेमे हम भी कुछ कम नही...' हे सिद्ध करत काम करतात. अशीच जिद्दी कथा अक्षदाची आहे. वीज वितरण कंपनीत आज अनेक महिला नोकरी करताहेत, पण ते काम चार भिंतीच्या आतील. मात्र, प्रत्यक्ष "फिल्ड वर्क' करताना, वायरमन म्हणून काम करताना महिला दिसणं हे मात्र कठीणच. विजेचे बटण दाबतानासुद्धा कधी कधी अनामिक भीती तर असतेच, अन्‌ खांबावर चढून काम करणे अन्‌ ते देखील महिलेने ही कल्पना कोणी करू शकत नाही. मात्र, जिद्दी व धाडसी अक्षदा हे काम करते. खारुताई जेवढ्या गतीने खांबावर चढते, तेवढ्याच गतीने अक्षदा विजेच्या खांबावर चढते, हे पाहताना नागरिक अचंबित होतात. 

शेतकरी कुटुंबातील बेताच्या परिस्थितीत जन्मलेल्या अक्षदाने घरचे, शेतीचे काम एवढेच नाहीतर घरातील आपल्या गायीचे दूध काढण्याचे काम करीत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आज हंगामी कामगार म्हणून विद्युत वितरण कंपनीत कामाला आहे. मोटारसायकल व चारचाकी वाहनही ती चालवते. आई आणि वडील आजही शेतात कष्ट करून जीवन जगत आहेत. मात्र, अक्षदाचे शिक्षण, तिचे ध्येय पूर्ण झाले पाहिजे, ही आंतरिक इच्छा. अक्षदा तशी लहानपणापासून थोडी भीत्री, पण जिद्दी. दहावीनंतर आपण वेगळे क्षेत्र निवडायचे हे तिने पक्के ठरवले होते आणि तोच हेतू डोळ्यासमोर ठेऊन तिने मेढा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री हा कोर्स 2015 ते 2017 या कालावधीत पूर्ण केला. 2018 मध्ये वीज वितरण कंपनीच्या करहर शाखेत तिने शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यास सुरवात केली. 
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती काम करताना कार्यालयामधील कामात तिचे मन रमेना, तिने सहकारी वायरमन यांच्यासह "फिल्ड'वर जाण्यास सुरवात केली. खांबावरील काम करताना तिचे सहकारी खांबावर चढून काम करीत, आपण देखील हे काम करू शकू, ही तिच्या मनातील ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. एक दिवस मी खांबावर चढून दुरुस्ती करते, असे म्हटल्यावर तिच्या सहकाऱ्यांनी तुला नाही जमणार, असे सांगताच तिने जिद्दीने खांबावर चढून दुरुस्ती केली अन्‌ तिच्यातील आत्मविश्वास दुणावला. अन्‌ 30 फूट उंचीवर चढून ती काम करू लागली. 

या क्षेत्रात काम करत असताना खांबावर चढून काम करणे, ट्रान्स्फॉर्मरमधील फ्यूज बदलणे ही धोकादायक कामे अक्षदा सहज करते. करहर विभागातील कोणत्याही गावातील खांबावरचे काम अक्षदा जेव्हा करते, तेव्हा नागरिकांच्या चेहऱ्यावर तिच्या जिद्दीला सलाम करावेत, असेच भाव उमटतात. अक्षदाने अवघ्या 20 व्या वर्षी एक वेगळे धाडसाचे काम करून जावळीकरांची मने जिंकली आहेत. 

आयुष्यात काहीतरी वेगळं व चांगलं करायचं ठरवलं होतं. ते मी करतेय. ज्या क्षेत्रात महिला काम करायला घाबरतात, अशा क्षेत्रात मला काम करताना एक वेगळाच आनंद मिळतो आहे. मला आई, वडील, भाऊ, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनासह कार्यालयातील अधिकारी, सहकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळते.'' 

-अक्षदा रांजणे, वीजतंत्री, करहर शाखा, वीज वितरण कंपनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com