लंडन ते टेंबलाईवाडी संवादाचा अनोखा प्रवास 

लंडन ते टेंबलाईवाडी संवादाचा अनोखा प्रवास 

कोल्हापूर - या दोघी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलच्या (ईस्ट फिंचले) शिक्षिका. केवळ आपल्याच शाळेतील मुले नव्हे तर अन्य देशांतील मुलांशी संवाद साधायचा, त्या मुलांना शिकवायचे आणि त्या मुलांकडूनही आपण काहीतरी वेगळे शिकायचे, ही त्यांची खूप इच्छा. एक चांगले निमित्त घडले आणि त्यांना चक्क कोल्हापुरातील टेंबलाईवाडीतील एका शाळेत यायची संधी मिळाली आणि "लंडन ते टेंबलाईवाडी' अशी शिक्षणाची वेगळी नाळ गेल्या काही दिवसांत जुळून गेली. 

अगदी शासकीय पातळीवर ठरवूनही सहजपणे जे शक्‍य झाले नसते ते कसे घडून आले त्याची ही गोष्ट. कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटलचे डॉ. सचिन कुलकर्णी टेंबलाईवाडीत राहतात. लंडनमधील प्रख्यात डॉक्‍टर जेरी कॉनव्हे व ते स्त्रियांच्या विशिष्ट आजारावर एक प्रबंध करत आहेत. त्या निमित्ताने डॉ. जेरी व त्यांची पत्नी जेन हे डॉक्‍टर कुलकर्णी यांच्या घरी राहायला आले. डॉ. कुलकर्णी यांच्या नोकराचा मुलगा त्र्यंबोली विद्यालयात तिसरीत शिकतो. त्याने एकदा डॉ. जेरी व त्यांची पत्नी जेन यांना हट्टाने आपल्या शाळेत नेले. या शाळेची स्थिती डॉ. कुलकर्णी व डॉ. जेरी यांनी पाहिली व त्यांनी या शाळेला बेंच, वीज कनेक्‍शन व बांधकामासाठी काही मदत केली व त्यातून शाळेचे रूपच पालटायला सुरवात झाली. 

मिसेस जेन कॉनव्हे यांना तर या शाळेचा लळाच लागला. या शाळेतील मुले गरीब व मध्यमवर्गातील. इंग्रजीचा गंध नाही आणि याच मुलांना इंग्रजीची तोंडओळख करून द्यायची जेन कॉनव्हे यांनी ठरविले. यासाठी त्यांनी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलशी संपर्क साधला. या शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस बेकन यांना ही कल्पना आवडली व त्यांनी जुली टेलर व ग्लासकिन या दोन तरुण धडपड्या शिक्षिकांना कोल्हापुरात पाठविण्याची तयारी दाखवली. या दोन्ही शिक्षिका काही दिवसांसाठी कोल्हापुरात येण्यास तयार झाल्या व काही दिवसांपूर्वी टेंबलाईवाडीतील या शाळेत दाखलही झाल्या. या शाळेतील गोरगरीब मुलांच्यात रमून गेल्या. मुलांच्यामध्ये फरशीवर बसून मुलांशी संवाद साधत राहिल्या. इंग्रजीचा गंध नसणारीही मुलं दोन दिवस थोडी बावचळली; पण मॅडम, गुड मॉर्निंग, मॅडम गुड अफ्टरनून, येस, नो, थॅंक्‍यू, टेक अ वॉटर, टेक अवर चपाती असं मोडकंतोडकं बोलत मुलं त्यांच्याशी संवाद साधू लागली. आता तर इंग्रजी-मराठी हा त्यांच्यातील भाषेचा फरकच संपून गेला आहे. मुलं थोडं थोडं इंग्रजी आणि या दोन्ही मॅडम थोडं थोडं मराठी बोलू लागल्या आहेत. त्यामुळे एक वेगळंच वातावरण टेंबलाईवाडीतील या शाळेत तयार झाले आहे. 

अर्थात या शाळेत या शिक्षिका कायमस्वरूपी असणार नाहीत. त्या लंडनला परत जाणार आहेत; पण या शाळेतील मुलांशी त्यांनी कायमस्वरूपी नाते जोडले आहे. मुलांशी मनापासून एकरूप होऊन गेले, की भाषेचीही अडचण कशी राहत नाही, याचं ते एक उदाहरण आहे. अर्थात डॉ. सचिन कुलकर्णी, त्र्यंबोली विद्यालयाचे प्रकाश मांजरेकर, मुख्याध्यापक सूर्यकांत माने, नगरसेविका शोभा कवाळे, संभाजी पाटील यांचेही यासाठी खूप सहकार्य झाले आहे. 

ए, बी, सी, डी बरोबरच ग, म, भ, न 
ही मुलं जशी ए, बी, सी, डी शिकत आहेत, तसंच लंडनमधील या दोन्ही शिक्षिका या मुलांकडून ग, म, भ, न शिकून घेत आहेत. या जसं इंग्रजी बोलतील तसं बोलायचा प्रयत्न मुले करत आहेत. ही मुलं जसं मराठी बोलतात तसं मराठी बोलायचा प्रयत्न या शिक्षिका करत आहेत. जणू लंडन ते टेंबलाईवाडी असा संवादाचा नवा प्रवासच यानिमित्ताने सुरू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com