दिये जलते है....

दिये जलते है....
दिये जलते है....

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती । झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती। समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी । निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर। काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो । कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परिज्योती। बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे। वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे। आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली । देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे। एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।

कवी वि.म. कुलकर्णी यांच्या या कवितेतून दिव्यांत होत गेलेले बदल, त्यांचा विकास नजरेसमोर येतो. जणू दिव्यांचा इतिहासच आपल्यापुढे साकारतो आणि प्रगती समजते. कवितेतून, ऐतिहासिक संदर्भ - कथांमधून, पलिता,मशाल, दिवटी, काकडा, समया, निरांजन, दीपस्तंभ अशी अनेक प्रकारची प्रकाशाची साधनं, दिवे भेटतात. अगदी प्राचीन काळात डोकावले तर नैसर्गिकरित्या पेटलेली जंगलं पाहून माणसानं प्रकाशासाठी प्रथम "ओंडका‘ वापरला असावा. त्यानंतर प्रगत होत जाणाऱ्या माणसानं दिव्याची तेल-वात ठेवण्यासाठी खोलगट दगड, शिंप, नारळाची करवंटी यांचा उपयोग केला. मातीची भांडी घडवताना त्यानं पणती घडवली.

मोहेंजोदडो संस्कृतीत असे काही दिवे सापडले. धातूच्या शोधानंतर धातूंची दीपपात्रे घडवली गेली. रामायण-महाभारतातही सोन्या-चांदीच्या, रत्नखचित दिव्यांचा उल्लेख आढळतो.

भारतीय दिव्यांच्या घडणीवर विविध संप्रदाय, धर्म, प्रदेश यांचा ठसा उमटलेला दिसतो. दिव्यांचा आकार आणि उपयोग यावरून हातात धरता येतील असे दिवे (हातदिवे), भिंतीवरील दिवे, जमिनीवरील उभे दिवे आणि टांगते दिवे असे प्रकार आढळतात. हातदिव्यांमध्ये आरतीदीप, निरांजन, अर्चनादीप, फुलवातदीप इ. येतात. यामध्येही विविध घाट, सुंदर कलाकुसर आणि प्रतीकात्मकता आढळते.

पलिते, मशाल, दिवटी, काकडा हेही खरंतर हातदिवेच. कित्येक ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. बऱ्याच किल्ल्यांवर, तटबंदीत मशालकऱ्यांसाठी खास जागा असत. पेटते पलिते बैलांच्या शिंगांना बांधून शत्रूची दिशाभूल केल्याची उदाहरणे आहेत. घरातल्या भिंतीतील कोनाड्यात, खुंटीवर, तुळई-खांबांच्या कड्यांना, देवळातील सभा मंडपातील भिंतींवर प्रकाशासाठी चिमणी, कंदील, बत्ती, रामादान अशा प्रकारची दीपपात्रे असत. यातील काही दिव्यांवर वृषभ, अश्‍व, हत्ती, गजलक्ष्मी यांच्या प्रतिमा असत. समई, दीपलक्ष्मी,दीपस्तंभ,वृक्षदीप हे जमिनीवरील उभे दिवे. अधिक उजेड मिळावा म्हणून दीपपात्रे लाकडी किंवा दगडी दिवठाणावर ठेवत. पण पुढे दिवठाण आणि दिवा जोडले जाऊन तयार झाली ती समई. देवघरात, मंदिराच्या गाभाऱ्यात एकसंध किंवा दोन, तीन भागांत जोडलेल्या, सुरेख कलाकुसरीच्या छोट्या आणि अगदी चार-पाच फुटी उंच, अशा मोठ्या समया तेवत असतात. घाटदार स्त्रीचा आकार, गजारूढ, कमलासनाधिष्ठित अशी कलात्मकता लेवून येते ती "दीपलक्ष्मी‘.

देवालया समोरील दगडात कोरलेला, लाकडी किंवा पितळी धातूचा "दीपस्तंभ‘ प्रकाशवाट दाखवत असतो. दीपवृक्षाचे दोन प्रकार आढळतात. एक निमुळता होत गेलेला "शंखाकृती‘तर दुसरा"अश्‍वत्थ‘ वृक्षासारखा अनेक पसरट फांद्यांचा, कमलपत्राच्या आकाराचे, मनोवेधक साखळ्यांचे "लामणदिवे‘ हे महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य! कीर्ती मुख, वैष्णव, शंख, शिवशक्ती, शरीराची कमान केलेली नृत्यांगना अशा आकाराचे, घाटाचे लामणदिवे अर्थात टांगते दिवे ! दीप देवताभ्यो नमः असं पूजेत म्हटलं आहे. "प्रकाशाची देवता‘ म्हणजे दिवा तेजाचं, मांगल्याचं प्रतीक. दिव्यांवरची कलाकुसर, प्रतिमा सांकेतिक आणि मनोवेधक!

बऱ्याच दीपस्तंभांवर गतिमान प्रकाशाचं द्योतक असलेला हंस आढळतो. पाना-फुलांची नक्षी, कमळ, मयूर, अश्‍व, गज, सिंह, नाग, लक्ष्मी अशा सांकेतिक प्रतिमाही विविध प्रकारच्या दिव्यांवर आढळतात. अलीकडे "भरपूर प्रकाश हवा!‘ या अपेक्षेपोटी देवघरापासून (समई, निरांजनसुद्धा) रस्त्यांवरील दिव्यांपर्यंत सगळीकडे विजेवर चालणारे विविध प्रकारचे दिवे लागले जातात. (अर्थात काही मंदिरं, देवघर याला अपवाद आहेत.) ट्यूब, मोठमोठे हॅलोजन दिवे, रंगीबेरंगी नळ्यांचे डिझाइन्स, डान्सिंग लाइट्‌स, प्रखर प्रकाशझोत, अधांतरी लटकलेल्या
जाहिराती, प्रखरता अत्यंत वेगाने दूरवर फेकलेल्या स्वैर प्रकाशरेषा, रोषणाईचा हैदोस हे सारंच झगझगीत, भगभगीत यामुळं माणसाच्या संवेदना, जाणिवा निबर आणि बोथट होताहेत की काय, अशी भीती वाटते.

रात्री प्रकाश असावा हे अगदी खरंच, पण तो गरजेपुरता असावा हेही ति तकंच खरं. शांत, सौम्यपणे तेवणारे दिवे, तो प्रकाश... जाणवण्याचे क्षण आता मर्यादित झाले आहेत. दिव्यांचा, त्याच्या प्रकाशाचा मनावर विलक्षण परिणाम होतो. जेव्हा हातातील पणतीचा प्रकाश चेहऱ्यावर पडतो किंवा समई, निरांजनाच्या प्रकाशानं मूर्ती अधिक तेजोमय होते, ते पाहून मनात प्रसन्नता निर्माण होते. निरांजन, समई, नंदादीप, पणती, लामणदिवे, दीपस्तंभ अशी प्रकाशाची साधनं, दिवे माणसाच्या भाववृत्तींना साद घालतात, चित्त वृत्ती खुलवतात.

या दिव्यातील सौम्य प्रकाशानं मनात सात्विकता निर्माण होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातील दीपस्तंभ, आतल्या मंडपातील भिंतीवरचे दिवे, लामणदिवे आणि गाभाऱ्यातील समई, निरांजन अशा क्रमानं येणारे दिवे मनाला विचारांना चढत्या क्रमानं दिशा देतात, शांतता- समाधान देतात आणि व्यवहारी जगात अडकलेलं मन हळूहळू आनंदी, प्रसन्न आणि शांत होत जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com