‘बाकी’काही नाही! मंगेशला डॉक्‍टर करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

आजारपणाचा बाऊ करू नका. मनात येणाऱ्या अयोग्य विचारांचा निर्भयपणे सामना करा. चांगले जगायचे असेल, तर जगण्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे.
- डॉ. अनिल अवचट

आई- वडिलांचा आशीर्वाद, रोज लागतात सहा इंजेक्‍शने

पुणे - '‘पूर्वी सहा मुले दगावली, त्यामुळे मंगेशला आम्हाला गमवायचे नव्हते. त्याला जन्मापासूनच रक्तातील साखर कमी होण्याचा दुर्मिळ आजार आहे. आम्ही हिम्मत हरलो नाही. घरातील होते नव्हते ते विकून मंगेशच्या उपचाराचा खर्च भागवला. छोट्याशा लेकराला दिवसातून पाच- सहावेळा इंजेक्‍शन द्यावे लागते. उपचारांचा खर्च परवडत नाही. आमच्याकडे बाकी काही नाही, तरीही त्याला शिकवून डॉक्‍टर करायचे आहे. समाजाने हात दिला तर हे स्वप्न नक्की पूर्ण होईल.’’ मधुमेहाचा सामना करणाऱ्या छोट्या मंगेशची आई रुक्‍मिणी व वडील रामदास ससे यांनी हा आशावाद जागवला.    

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ‘आजाराला सामोरे जाताना’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील ससेवाडीच्या अडीचवर्षीय मंगेशच्या जन्मतःच शरीरांतर्गतची साखर कमी होण्याच्या आजाराला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा प्रवास त्याच्या आई-वडिलांनी उलगडला. बाला कुलकर्णी, अनिल कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष जगमोहन तळवलकर, सचिव डॉ. रमेश गोडबोले, डॉ. आनंद शिंदे, डॉ. अजित वाळिंबे उपस्थित होते.

रुक्‍मिणी ससे म्हणाल्या, ‘‘मन घट्ट करून मंगेशला इंजेक्‍शन देण्यास सुरवात केली. त्याला जगवायचे, एवढेच आम्ही ठरवले होते. आता त्याचे खाणे-पिणे, खेळणे, वेळेवर औषधे घेणे सारे काही सुरळीत सुरू आहे. मंगेशच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आत्तापर्यंतचा संघर्ष मोठा होता.’’ रामदास ससे म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत नऊ लाख रुपये खर्च आला, त्यापैकी पाच लाख रुपये आम्ही स्वतः केला.’’ मेधा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Ramdas Sase to doctor will Mangesh