मला खूप भूक लागली आहे, जेवण द्या ना...

मला खूप भूक लागली आहे, जेवण द्या ना...

महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथे एका ट्रकचालकाने सोडून दिलेला पश्‍चिम बंगालमधील विशेष असलेल्या अल्पवयीन मुलाला सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी आधार दिला. या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंचर पोलिसांच्या माध्यमातून मुलाच्या नातेवाइकांशी संपर्क होईपर्यंत घरचा निवारा मिळण्यासाठी त्याला ‘शिव ऋण’ संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख यांना एक अल्पवयीन मुलगा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भटकंती करताना दिसला. मुलाने ‘मला खूप भूक लागली आहे, जेवण द्या ना,’ अशी विनवणी शेख यांच्याकडे केली. मुलगा पूर्ण घाबरलेला होता. त्यांनी मुलाला प्रथम जेवण व कपडे दिले. धीर देऊन विश्‍वासात घेतल्यानंतर त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. ‘मी पश्‍चिम बंगाल येथील आहे. मला एका ट्रक ड्रायव्हरने पुण्याला आणून या भागात सोडून तो निघून गेला आहे, मला घरी जायचे आहे,’ असे मुलाने हात जोडून अडखळत तोकड्या मोडक्‍या मराठीत सांगितले. त्यानंतर शेख यांनी सदर मुलाची माहिती मंचर पोलिसांना दिली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांचे पत्र घेतले. त्यानंतर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठाने संचालक यादव चासकर, शिव ऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिकेत बोऱ्हाडे, संचालक प्रवीण वाघमारे, मेहुल नवले, प्रमोद शिंदे, मयूर पडवळ, अजित आवटे यांनी मंचर पोलिसांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला आहे. तोपर्यंत घरचा निवारा मिळावा म्हणून शिव ऋण संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

शिव ऋण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे यांनी मुलाच्या नातेवाइकांचा शोध लागेपर्यंत सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आतापर्यंत ५४० बेवारस विशेष व्यक्तींना आधार दिला आहे. अनेकांना त्यांच्या घरापर्यंत पोचविण्याचे काम केले आहे. सरकारने अशा सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत व संरक्षण देणे गरजेचे आहे.
- यादव चासकर, संचालक, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com