चाळीसगावची हर्षा बनली 'पायलट'

चाळीसगावची हर्षा बनली 'पायलट'

21 व्या वर्षी "कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ठरली एकमेव महिला वैमानिक
चाळीसगाव - वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी "एअर इंडिया‘मध्ये "कमर्शिअल पायलट‘ म्हणून रुजू झालेल्या चाळीसगावच्या हर्षा महाले (राजपूत) हिने गगन भरारी घेऊन चाळीसगावच्या लौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे, 21 व्या वर्षी "कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ही भारतातील एकमेव महिला वैमानिक ठरली आहे.

खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी पशुवैद्यकीय विभागातील निवृत्त उपायुक्त डॉ. अमरसिंग महाले यांची कन्या असलेल्या हर्षाने लहानपणीच विमान चालविण्याचे स्वप्न बाळगले होते. घरातील शैक्षणिक वातावरणामुळे स्वप्न साकारण्यासाठी आई-वडिलांसह कुटुंबीयांनी तिला सुरवातीपासूनच प्रोत्साहन दिले. नोकरीच्या निमित्ताने डॉ. महाले यांचे मुंबईत वास्तव्य होते. त्यामुळे हर्षाचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हर्षाने सर्वप्रथम "पायलट‘ होण्यासाठी काय तयारी लागते, याची सर्व माहिती जाणून घेतली. त्यासाठी ती रायबरेली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान ऍकॅडमीत गेली. हैदराबादच्या एका संस्थेतूनही तिने प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम जाणून घेतला. "पायलट‘साठी असलेल्या आवश्‍यक त्या वैद्यकीय तपासणीमध्ये ती पात्र ठरली. त्यानंतर "एअर बस‘च्या दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी तिने प्रवेश घेतला. अमेरिकेतील फ्लोरिडा व त्यानंतर टेक्‍सास येथे तिने तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान हर्षाला बरेच काही शिकता आले. विमान चालवतानाचा अनुभव विलक्षण असून यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असल्याचे ती सांगते.

पायलट म्हणून नियुक्ती
हर्षा महाले हिची "एअर बस 302‘ची सीनिअर पायलट म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. या पदासाठी भारतातून जवळपास 550 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यातून हर्षा ही राजपूत समाजातील पहिली व एकमेव महिला पायलट ठरली आहे. चाळीसगावच्या या कन्येने "नासा गर्ल‘ स्विटी पाटेसारखी उंच भरारी घेतली आहे.

ठाण्यात मान्यवरांतर्फे हर्षाचा गौरव
हर्षा महालेची कमर्शिअल पायलट म्हणून नियुक्ती झाल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकूर, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक व उद्योजक सरकारसाहेब रावल आदींनी तिचा ठाण्यात नुकताच गौरव केला.

शालेय जीवनापासून ध्येय निश्‍चित केले व ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर यश हमखास मिळते. पायलट होणे काही कठीण नाही. शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम असलो व जिद्द बाळगली तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
- हर्षा महाले (राजपूत) - सीनिअर पायलट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com