शासकीय यंत्रणेनेही घातली बोटे तोंडात...

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह तरुण वर्ग, महिला व गावकऱ्यांनी २० मे २०१७ ला सुरू केलेले हे महत्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. ५६ लाखांचे काम केवळ ८ ते १० लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली.

जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह तरुण वर्ग, महिला व गावकऱ्यांनी २० मे २०१७ ला सुरू केलेले हे महत्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. ५६ लाखांचे काम केवळ ८ ते १० लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली.

फुले कृषी प्रतिष्ठान व देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशनचे विशेष सहकार्य...
या घटबारी धरणाच्या उभारणीसाठी औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानतर्फे चार लाख तर देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशनतर्फे दीड लाखाची भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. लोकवर्गणीतून सुमारे तीन-साडेतीन लाख रुपये निधी जमवून ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले हे धरण सुमारे नऊ लाखात पूर्ण झाले.

चार ते पाच हजार एकर जमीन ओलिताखाली, हजारावर शेतकऱ्यांना लाभ...
या घटबारी धरणामुळे सुमारे ४ ते ५ हजार एकर जमीन ओलिताखाली आली असून  हजारावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. धरणाच्या परिसरातील विहिरींमध्ये अवघ्या पाच ते दहा फुटावर जलसाठा आहे. त्यामुळे शेतकरी सुखावलाय. गहू, हरभरे, कापूस, कांदा, मिरची, डाळिंब, मका, भुईमूग, भाजीपाला आदी पिके शेतीत घेतली जातात.

जनावरांसाठी पाण्याची सोय...
या घटबारी धरणामुळे मुक्या प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. खुडाणे व डोमकानी ही दोन्ही गावे वगळता अन्यत्र पाच किलोमीटर परिसरात गुरा-ढोरांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने घटबारीमुळे ती समस्या निकाली निघाली आहे. साधारण जून-जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा आज धरणात शिल्लक आहे.

पंचनामे होऊनही अद्याप शासनाकडून नुकसान भरपाई नाही...
घटबारी धरण फुटल्यानंतर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकर शेतजमिनीचा पंचनामा झाला होता. परिसरातील शेतकऱ्यांच्या सुमारे साडेचारशे ते सहाशे विहिरी बुजल्या गेल्या होत्या. उभी पिके नष्ट झाली होती. गुरे-ढोरे मृत्युमुखी पडली होती. परंतु शासनाकडून आजतागायत एक पैसाही मोबदला मिळालेला नाही. अशी प्रतिक्रिया परिसरातील .शेतकऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली.

शासनाने नुकसान भरपाई दिल्यास धरणाची दुरुस्ती...
'घटबारी'मुळे विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे यावर्षी शेतीत पिके चांगली आली आहेत. शासकीय पातळीवरून जर नुकसान भरपाई मिळाली तर तो पैसा आम्ही घटबारी जलसंधारण समितीकडे सुपूर्द करून धरणाचे उर्वरित काम पूर्ण करू. अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी उत्तम हेमाडे, दशरथ हेमाडे, राजसबाई हेमाडे, दादाजी गवळे, हिलाल गवळे आदींनी दिली आहे.

मतदारसंघातील आमदार व खासदारांबाबत नाराजी...
घटबारी धरण फुटल्यानंतर व त्याची उभारणी झाल्यानंतर 'पाहणी दौरा' व 'आश्वासने' याव्यतिरिक्त काहीही ठोस भरीव मदत मतदार संघातील आमदार व खासदारांकडून आम्हाला मिळाली नाही. अशी जाहीर नाराजी खुडाणेकरांनी आमदार डी. एस. अहिरे व खासदार डॉ. हीना गावित यांच्याबद्दल व्यक्त केली. वनविभाग व कृषी विभागानेही पाहिजे तेवढी मदत केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकसहभागातून 'घटबारी'च्या कामाची पहिली बातमी 'सकाळ'मधून...
श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुरू केलेल्या 'घटबारी'च्या कामाचे पहिले सविस्तर वृत्त 'सकाळ'ने प्रकाशित केले होते. त्यामुळे आमच्या ह्या लोकसहभागातून सुरू केलेल्या चळवळीला अधिक बळ मिळाले. अशी प्रतिक्रिया खुडाणेचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे पराग माळी यांनी दिली.

निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात अनुकरण...
खुडाणे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून निर्माण झालेल्या 'घटबारी'च्या या आदर्शवत कामाचे अनुकरण संपूर्ण माळमाथा परिसरात होत आहे. त्यानुसार नुकतेच रायपूर व कळंभीर येथील ग्रामस्थांनी लोकसहभागाने 'सालदरा' धरणातून गाळ काढायच्या कामाला सुरुवात केली आहे. तर निजामपूर-जैताणेतील ग्रामस्थांनीही लोकसहभागातून रोहिणी नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करायचे काम हाती घेतले. आहे.

घटबारी धरणाच्या कामाचे श्रेय कुणीही लाटू नये...
"घटबारी धरणाच्या पुनर्निर्माणाचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, स्थानिक ट्रॅक्टर युनियन, अनुलोम, देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशन, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान (औरंगाबाद) यांच्यासह ज्यांनी-ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले अशा सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना जाते. त्यामुळे घटबारी धरणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये."
- पराग माळी, सरपंच प्रतिनिधी व युवा कार्यकर्ते, खुडाणे.

"आजपर्यंत शासनाने आपल्या तिजोरीतून या कामासाठी एक दमडीसुद्धा आर्थिक मदत दिलेली नाही. ही अतिशय खेदाची व लाजिरवाणी बाब आहे."
- नामदेव गवळे, उपसरपंच, खुडाणे ता. साक्री.

शासनाकडून सापत्न वागणूक..
"खुडाणेवासीयांनी लोकसहभागातून अहोरात्र परिश्रम घेऊन पूर्ण केलेल्या ह्या कामाची शासनाने साधी दखलही घेतली नाही. पुरस्कार देणे तर दूरच उलट आम्हाला डावलून सापत्न वागणूक दिली."
- कन्हैयालाल काळे, ग्रामपंचायत सदस्य, खुडाणे.

"अवघ्या आठ महिन्यात लोकवर्गणी, लोकसहभाग व श्रमदानातून धरणनिर्मिती ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विशेष घटना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खुडाणे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत."
- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे.

"प्रत्येक काम हे शासनानेच केले पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता 'घटबारी'सारखी आदर्शवत कामे ही ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेवून लोकसहभागातून केली पाहिजेत."
- संदीप भोसले, तहसीलदार, साक्री.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule khudane gaon people complete ghatbari dam work