पुत्र जयसिंगसमवेत लक्ष्मीबाई सुर्वे.
पुत्र जयसिंगसमवेत लक्ष्मीबाई सुर्वे.

१०७ व्या वर्षीही लक्ष्मीबाई सुर्वे ठणठणीत!

आदर्शवत जीवन; ४० वर्षे शाकाहार हाच आरोग्याचा मूलमंत्र

सावर्डे - दुपारचे दोन वाजलेले, उन्हाची प्रचंड काहिली. कोणीही मेटाकुटीला येईल असे आग ओकणारे ऊन असतानाही कौलारू घरात खाटेवर पाठीला तक्‍क्‍या, डोक्यावर पदर, चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेली त्वचा, डोळ्यावर चष्मा, माणसं ओळखण्याची पारख असलेली, थकलेल्या शरीराची आजीबाई घराचे दार उघडतात... त्या आवाज देतात, तोही खणखणीत... कोण आलंय... १०७ वर्षांच्या आजींचा हा आवाज आहे त्यावर विश्‍वासही बसणे कठीण; परंतु प्रत्यक्षात श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र सुर्वे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या आजी समोर आल्यावर आश्‍चर्य वाटते.

जागतिक आरोग्य दिनाला प्रकृती कशी सांभाळायची याबाबत जागृती होत असताना आजींची भेट कुतूहलाने घेतली. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती, उभ्या आयुष्यात आजार म्हणजे काय माहीत नसलेल्या लक्ष्मीबाईंनी शतकोत्तर जीवनाचे रहस्य ‘सकाळ’जवळ उलगडले. एकच संदेश दिला, ‘योग्य खाणं-पिणं’. 

पती रामचंद्र कृष्णाजी सुर्वे भारतीय लष्करात हवालदार या पदावर देशसेवा करत होते. कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची. पती लष्करात असताना देखील घर जेमतेम पगारात चालवले जायचे. पहिला मुलगा नाना सुर्वे याचा जन्म १९५० चा, तर दुसरा मुलगा जयसिंग तथा दादा सुर्वे याचा जन्म १९५५ ला झाला. पती रामचंद्र हे १९५४ ला लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कापड गिरण्यांमध्ये नोकरी केली; पण संघर्षमय जीवनात १९९० ला त्यांचे निधन झाले. मुले मोठी झाली. एक एसटीमध्ये नोकरीला

लागला, दुसरा एका खासगी संस्थेत. परिस्थिती सुधारत गेली. 
‘सोवळ्या-ओवळ्याचे अवडंबर न करता  स्वच्छतेला महत्त्व दिले. निरोगी शरीरात देव सदैव वास करत असतो, असे शिकवले होते. त्याप्रमाणे जगले. ४० वर्षे शाकाहार हे १०७ वर्षे जगण्यामागचे रहस्य आहे. वेळच्या वेळी आहार, तोही समतोल घेतल्याने कोणताही आजार आपल्या शरीरात शिरकाव करत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले आजही त्या दररोज एक किलोमीटर चालतात. रात्री लवकर झोपतात, सकाळी लवकर उठतात. स्वतःची कामे स्वतः करतात. पती रामचंद्र सुर्वे यांच्या निवृत्तिवेतनावर त्यांचा स्वतःचा चरितार्थ चालतो, एवढ्या त्यांच्या गरजा कमी आहेत. नातवंडे, पणतवंडे साऱ्यांसोबत कृतार्थ जीवन त्या जगत आहेत.

कडक शिस्तीमध्ये आम्ही वाढलो. आईने आम्हाला बाहेरील पदार्थ कधीच दिले नाहीत. ती घरातच सर्व प्रकारचे पदार्थ बनवून देत असे. आजची पिढी चायनीज, फास्टफूडच्या आहारी जात आहे. ते टाळून आहार-विहाराकडे लक्ष दिल्यास आईसारखे निरोगी राहू शकतो. 
- जयसिंग सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com